

मुल्लनपूर; वृत्तसंस्था : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुरुवारी धमाकेदार कामगिरी करत इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ‘क्वालिफायर 1’ सामन्यात पंजाब किंग्जला 8 विकेटस्ने सहज पराभूत केले. या विजयासह त्यांनी अंतिम सामन्याचे तिकीट पक्के केले. बंगळूर ‘आयपीएल 2025’ मध्ये अंतिम सामन्यात पोहोचलेला पहिला संघ ठरला आहे. तथापि, या पराभवानंतरही पंजाब किंग्जचे आव्हान अद्याप संपलेले नाही. त्यांना अजूनही अंतिम सामना गाठण्यासाठी दुसरी संधी मिळणार आहे. ते आता 1 जून रोजी ‘क्वालिफायर-2’ सामन्यात खेळतील.
गुरुवारी मुल्लनपूरला झालेल्या ‘क्वालिफायर-1’ सामन्यात पंजाब किंग्जने बंगळूरसमोर केवळ 102 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग बंगळूरने 10 षटकांत 2 विकेटस् गमावत 106 धावा करून सहज पूर्ण केला. बंगळूरच्या या विजयात त्यांच्या गोलंदाजांचा मोठा वाटा राहिला. तसेच फिल सॉल्टनेही खणखणीत अर्धशतक ठोकत महत्त्वाचे योगदान दिले.
बंगळूरकडून फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी सलामीला फलंदाजीला येत डावाची सुरुवात केली होती. त्यांनी चांगली सुरुवातही केली; पण कायले जेमिसनने चौथे षटक अप्रतिम टाकले. त्याने विराटला 12 धावांवर जोश इंग्लिसच्या हातून झेलबाद केले. त्यानंतरही त्याने तीनदा मयंक अगरवालला बीट केले. हे षटक त्याने निर्धाव टाकले. मात्र, त्यानंतर फिल सॉल्टने आक्रमक पवित्रा घेत मोठे शॉटस् खेळले. मयंक अगरवाल 8 व्या षटकात मुशीर खानविरुद्ध खेळताना श्रेयस अय्यरच्या हातून 19 धावांवर झेलबाद झाला; पण तोपर्यंत बंगळूर विजयाच्या जवळ पोहोचले होते. सॉल्ट आणि मयंक यांच्यात दुसर्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी झाली.
मयंक बाद झाल्यानंतर सॉल्ट आणि कर्णधार रजत पाटीदार यांनी उर्वरित धावा पूर्ण करत विजयावर शिक्कामोर्तब केले. सॉल्टने 23 चेंडूंत त्याचे अर्धशतक केले. तो 27 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 56 धावा करून नाबाद राहिला. रजत 8 चेंडूंत 15 धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, बंगळूरने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 14.1 षटकांत सर्वबाद 101 धावाच केल्या. पंजाबकडून फॉर्ममध्ये असलेले प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या सलामीवीरांनी डावाची सुरुवात केली; पण दुसर्याच षटकात यश दयालने कृणाल पंड्याच्या हातून प्रियांश आर्यला 7 धावांवर माघारी धाडले. प्रभसिमरनने काही आक्रमक शॉटस् खेळले; पण त्यालाही तिसर्या षटकात भुवनेश्वर कुमारने 18 धावांवर जितेश शर्माच्या हातून झेलबाद केले.
पाठोपाठ जोश हेझलवूडने दोन मोठे धक्के चौथ्या आणि सहाव्या षटकात पंजाबला दिले. त्याने चौथ्या षटकात कर्णधार श्रेयस अय्यरला 2 धावांवर आणि सहाव्या षटकात जॉस इंग्लिसला 4 धावांवर बाद केले. नेहल वढेराही 8 धावा करून 7 व्या षटकात यश दयालविरुद्ध त्रिफळाचीत झाला. त्यामुळे 50 धावांतच पंजाबला 5 धक्के बसले. मार्कस स्टॉईनिसने एक बाजू काही वेळ सांभाळलेली होती. सुयश शर्माने 9 व्या षटकात शशांकला 3 धावांवर त्रिफळाचीत केले, तर मुशीरला शून्यावर पायचीत पकडले. 11 व्या षटकात सुयशनेच धोकादायक ठरू शकणार्या स्टॉईनिसला 26 धावांवर त्रिफळाचीत करत आठवा धक्का दिला. त्यानंतर 14 व्या षटकात हरप्रीत ब्रारला रोमरियो शेफर्डने 4 धावांवर त्रिफळाचीत केले. 15 व्या षटकात उमरझाईचा एका हाताने अफलातून झेल जितेश शर्माने घेतला. त्यामुळे पंजाब किंग्जचा डावही संपला.
बंगळूरकडून जोश हेझलवूड आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी 3 विकेटस् घेतल्या. यश दयालने 2 विकेटस् घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमार आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.बंगळूरची ही अंतिम सामन्यात पोहोचण्याची एकूण चौथी वेळ आहे. यापूर्वी 2009, 2011 आणि 2016 साली त्यांनी अंतिम सामना गाठला होता. मात्र, तिन्ही वेळेला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यंदा आता ते पहिले विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न 3 जूनला अहमदाबादमध्ये करतील. 3 जून रोजी अहमदाबादला अंतिम सामना होणार आहे. आज (शुक्रवारी) एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध क्वालिफायर 2 मध्ये पंजाबला दोन हात करावे लागणार आहे. क्वालिफायर 2 मध्ये विजेता होणारा संघ बंगळुरूविरुद्ध अंतिम सामना खेळेल.