

आयसीसीने नुकतीच एकदिवसीय क्रमवारीत मोठा बदल जाहीर केला आहे. चालू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेदरम्यान जाहीर झालेल्या ताज्या महिला एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत मोठा बदल दिसून आला आहे.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हीलीने तब्बल ९ स्थानांची मोठी झेप घेत थेट चौथ्या स्थानावर कब्जा केला आहे. हीलीने नुकत्याच विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यात दमदार शतक ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. तिने १०७ चेंडूंमध्ये २१ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १४२ धावांची शानदार खेळी केली. या अप्रतिम कामगिरीमुळे तिला आयसीसी क्रमवारीत मोठे यश मिळाले असून, तिचे रेटिंग आता ७०० झाले आहे. सध्या तिच्या पुढे केवळ ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी, इंग्लंडची नॅट सायव्हर-ब्रंट आणि भारताची स्मृती मानधना आहे.
भारतीय फलंदाज स्मृती मानधना महिला एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. तिचे रेटिंग ७९३ आहे. तिच्या पाठोपाठ नॅट सायव्हर-ब्रंट (७४६) आणि बेथ मूनी (७१८) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्टलाही फायदा झाला असून, तिने ३ स्थानांची प्रगती करत चौथे स्थान गाठले आहे. न्यूझीलंडची सोफी डिवाइन २ स्थानांची सुधारणा करत सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरी आणि ॲश्ले गार्डनर यांना क्रमवारीत नुकसान सहन करावे लागले आहे. पेरी एका स्थानाने घसरून सातव्या क्रमांकावर पोहोचली आहे, तर ॲश्ले गार्डनर ३ स्थानांनी खाली येत आठव्या क्रमांकावर आली आहे.
टॉप १० मध्ये पाकिस्तानची सिद्रा अमीन नवव्या स्थानी आहे, तिने एक स्थानाची प्रगती केली आहे. या क्रमवारीत सर्वाधिक नुकसान दक्षिण आफ्रिकेच्या ताझमिन ब्रिट्सला झाले असून, ती थेट ६ स्थानांनी घसरून दहाव्या क्रमांकावर आली आहे.