

ज्या खेळाडूचे वडील एकेकाळी मैदानात साफसफाईचे काम करायचे आणि आई मंदिराबाहेर फुले विकायची, त्याच पाथुम निसंकाने श्रीलंकेसाठी क्रिकेटच्या मैदानावर एक मोठी कामगिरी केली आहे. निसंकाने गॅले येथे सुरू असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात आक्रमक फलंदाजी करताना शानदार शतक झळकावले. त्याने 136 चेंडूत शतकी मजल गाठली. यादरम्यान त्याने 13 चौकार आणि 1 षटकार ठोकला.
गॅले कसोटीच्या पहिल्या डावात बांगलादेशने 495 धावांचा डोंगर उभारला होता. याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेनेही जोरदार सुरुवात केली. श्रीलंकेचा पहिला गडी लाहिरू उडारा 47 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर अनुभवी फलंदाज दिनेश चंडिमलच्या साथीने पाथुम निसंकाने शतकी भागीदारी रचत श्रीलंकेचा डाव सावरला. या दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीला 83 चेंडूंमध्ये 50 धावांची भागीदारी केली.
निसंकाने त्याचे अर्धशतक 88 चेंडूंमध्ये पूर्ण केले. अर्धशतकानंतर अधिक आक्रमक पवित्रा घेत त्याने केवळ 136 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. दुसरीकडे, चंडिमलनेही 99 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने श्रीलंकेची धावसंख्या 200 धावांच्या पुढे नेण्यात मोलाचे योगदान दिले.
निसंकाने कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. विशेष बाब म्हणजे त्याने ही तिन्ही शतके वेगवेगळ्या फलंदाजी क्रमावर खेळताना झळकावली आहेत. तसेच, श्रीलंकेच्या भूमीवरील त्याचे हे पहिलेच कसोटी शतक आहे. यापूर्वी त्याला मायदेशात कसोटी शतक नोंदवता आले नव्हते, त्यामुळे हे शतक त्याच्यासाठी आणि श्रीलंकेच्या क्रिकेटसाठी विशेष महत्त्वाचे आहे. या खेळीदरम्यान त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 1000 धावांचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला.
पथुम निसंकाने 2021 मध्ये श्रीलंकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने 17 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 1046 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 3 शतके आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने केवळ कसोटी क्रिकेटमध्येच नव्हे, तर एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्येही आपली चमक दाखवली आहे. निसंकाने 66 एकदिवसीय सामन्यांमध्ये 41 हून अधिकच्या सरासरीने 2508 धावा फटकावल्या आहेत, ज्यात एका द्विशतकाचाही समावेश आहे. टी-20 क्रिकेटमध्येही त्याने सुमारे 30 च्या सरासरीने 1734 धावा केल्या आहेत.
या सामन्यात तत्पूर्वी, बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली होती. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शांतो (148 धावा) आणि अनुभवी मुशफिकुर रहीम (163 धावा) यांनी शानदार शतके झळकावली होती. लिटन दासनेही 90 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 495 धावांपर्यंत मजल मारू शकला.