

Parveen Hooda wins Gold Asian Games : आशियाई क्रीडा स्पर्धेत आजचा (दि. २ ऑक्टोबर) दिवस महिला बॉक्सरनी गाजवला. लोव्हलिनानंतर परवीन हुडानेही सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. तिने चायनीज तैपेईच्या निएन-चिन चेनचा ३-२ असा पराभव करून महिलांच्या ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. आशियाई स्पर्धेतील हे भारताचे १३ वे सुवर्णपदक ठरले आहे.
सामन्याची सुरुवात परवीनने अत्यंत आक्रमक पद्धतीने केली. पाचही पंचांनी १०-९ अशा फरकाने परवीनच्या बाजूने कौल दिला. तैवानच्या चेनने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र परवीनने आक्रमक पवित्रा घेत तिला बॅकफूटवर ढकलले. पहिल्या फेरीत निर्विवाद वर्चस्व गाजवत परवीनने सामन्यावर मजबूत पकड मिळवली.
दुसऱ्या फेरीत परवीनने आपला बचाव अधिक मजबूत करण्यावर भर दिला. प्रतिस्पर्धी चेनने आपली रणनीती बदलली. तिने पंचांच्या अचूकतेवर भर दिला. पंचांनी ही फेरी ५-० अशी पूर्णपणे चेनच्या बाजूने दिली. पाचही पंचांनी या फेरीत चेनला १०-९ असे गुण दिले. त्यामुळे सामना अंतिम आणि निर्णायक फेरीत पोहोचला.
तिसऱ्या फेरीत परवीनने जोरदार कमबॅक केले. निर्णायक तिसऱ्या फेरीत दोन्ही बॉक्सर्सनी सुवर्णपदकासाठी सर्वस्व पणाला लावले. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रतिहल्ले चढवण्यात आले. अखेर पंचांचा अंतिम निर्णय आला अन् ३-२ अशा अत्यंत चुरशीच्या फरकाने परवीन हुडाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. आशियाई स्पर्धेतील हे भारताचे १३ वे सुवर्णपदक ठरले आहे.
लोव्हलिना बोर्गोहेनने आज सकाळी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. महिलांच्या ७५ किलो वजनी गटातील बॉक्सिंग स्पर्धेत तिने चीनच्या बाओ झियीचा ५-० असा एकर्फी पराभव केला. अंतिम सामन्यात लोव्हलिनाने संयमाने चीनची प्रतिस्पर्धी बाओ झियाला केवळ रोखलेच नाही तर प्रभावी 'काउंटर-पंच' मारून प्रत्युत्तर दिले. बाओने अधिक आक्रमकपणे पुढे येण्याचा प्रयत्न केला; परंतु लोव्हलिना अधिक आत्मविश्वासपूर्ण आक्रमकपणे प्रभावी 'पंच' मारले. लोव्हलिनाने दुसरा राऊंड ४-१ ने जिंकला, ज्यामुळे एक राऊंड बाकी असताना तिला एकूण २-० अशी आघाडी मिळाली. यानंतर तिसऱ्या राऊंडवरही वर्चस्व राखले आणि एक दमदार विजय साकारला.