

New Zealand cricket central contract 2025
आयपीएल 2025 च्या फायनलपूर्वी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने 2025-26 हंगामासाठी खेळाडूंसाठीचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केले. ब्लॅक कॅप्सने या वर्षीच्या करारात 4 नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे. 20 खेळाडूंचा समावेश केला आहे. ज्यात पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसन यालाही स्थान मिळाले आहे. तसेच या यादीत मिच हे, मुहम्मद अब्बास, झॅक फौल्क्स आणि आदित्य अशोक या चार नव्या खेळाडूंना सामील करण्यात आले आहे.
गेल्या वर्षभरात मिच हे, मुहम्मद अब्बास, झॅक फौल्क्स आणि आदि अशोक यांनी न्यूझीलंडसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याचे बक्षिस या चारही खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या रुपात मिळाले आहे. हे सर्व खेळाडू जुलैमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करतील आणि येणाऱ्या काळात वेस्ट इंडिज आणि इंग्लंडसारख्या संघांविरुद्ध खेळतील अशी अपेक्षा आहे. आता येत्या काळात न्यूझीलंडच्या चाहत्यांच्या नजरा या खेळाडूंवर असतील.
सेंट्रल कॉन्ट्रॅक्टबद्दल न्यूझीलंड क्रिकेटचे सीईओ स्कॉट वेनिंक म्हणाले की, ‘मिच, मुहम्मद, आदित्य आणि जॅक यांना करार मिळाल्याने हे दिसून येते की न्यूझीलंडकडे भविष्यासाठी अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. या खेळाडूंनी दाखवून दिले आहे की ते मोठ्या पातळीवर स्पर्धा करू शकतात. ते सर्व न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करण्यास उत्सुक आहेत.’
यावेळी न्यूझीलंडमधील एकूण 20 खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान मिळाले आहे. परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की केन विल्यमसन, डेव्हॉन कॉनवे, फिन अॅलन, लॉकी फर्ग्युसन सारख्या दिग्गज आणि नावजलेल्या खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही. बोर्डाने स्पष्ट केले की, आम्ही या सर्व खेळाडूंवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. येत्या काही दिवसांत कामगिरीच्या आधारे त्यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टवर निर्णय घेतला जाईल.
आदित्य अशोक, मायकेल ब्रेसवेल, टॉम ब्लंडेल, मार्क चॅपमन, जेकब डफी, जॅक फॉल्क्स, मिच हे, मॅट हेन्री, काइल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, मुहम्मद अब्बास, हेन्री निकोल्स, विल ओ'रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, बेन सीअर्स, नॅथन स्मिथ, विल यंग.