

अहमदाबाद : 18 वर्षे एखाद्या जेतेपदाची प्रतीक्षा करणे किती कष्टप्रद असते, याचा ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभव घेणारे ‘आरसीबी’ व पंजाबचे संघ आज ‘आयपीएल’ निर्णायक जेतेपदासाठी आमने-सामने भिडतील, त्यावेळी अवघ्या क्रिकेट वर्तुळासाठी ती अनोखी पर्वणी ठरणार आहे. एकीकडे, विराट कोहलीचा करिष्मा तर दुसरीकडे, श्रेयस अय्यर फॅक्टरमध्ये या निमित्ताने जोरदार रस्सीखेच रंगणे अपेक्षित आहे. एका अर्थाने ‘अँग्री यंग मॅन विरुद्ध विराटियन’, असेच या लढतीचे स्वरूप असेल. उभय संघातील ही लढत सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवली जाईल. विराट कोहली या स्पर्धेच्या प्रारंभापासूनच ‘आरसीबी’ संघाशी एकनिष्ठ राहत आला असून, मंगळवारी त्याला येथे आपल्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये ‘आयपीएल’ जेतेपद समाविष्ट करण्याची नामी संधी असेल. मुंबईला चारीमुंड्या चीत करण्यात सिंहाचा वाटा उचलणारा श्रेयस अय्यर मात्र ‘आरसीबी’च्या मार्गातील मुख्य अडथळा ठरू शकतो. ‘आरसीबी’ने आजवर तीनवेळा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, या तिन्ही वेळा त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. ती कसर एका मॅचविनिंग खेळीने भरून काढण्याचा विराट कोहलीचा अर्थातच निर्धार असणार आहे.
दुसरीकडे, श्रेयस अय्यरदेखील मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आणल्यानंतर तशीच आणखी एक धडाकेबाज खेळी ‘आरसीबी’विरुद्ध साकारत पंजाबला अविस्मरणीय विजय संपादन करून देण्यासाठी महत्त्वाकांक्षी असणार आहे. श्रेयससाठी ‘आयपीएल’ची फायनल नवी नाही. त्याने 2020 च्या ‘आयपीएल’ फायनलमध्ये दिल्लीचे नेतृत्व केले होते, तर गतवर्षी ‘केकेआर’ संघाचा कर्णधार या नात्याने त्यानेच झळाळता ‘आयपीएल’ चषक उंचावला होता. यंदा त्याचीच पुनरावृत्ती पंजाबकडून करण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे.
‘आरसीबी’चा संघ कर्णधार रजत पाटीदार व मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्या मार्गदर्शनाखाली नवनवे पराक्रम गाजवत आला असून, त्यांच्याकडे जवळपास प्रत्येक क्रमांकावर मॅचविनर्स आहेत. गतवर्षी या संघातील काही मुख्य खेळाडूंवरच अतिरिक्त भार होता. यंदा मात्र त्यांचे अनेक खेळाडू चमक दाखवत आले आहेत. जलद गोलंदाज जोश हेझलवूड परतल्याने ‘आरसीबी’ची गोलंदाजी मजबूत झाली असून, फिल सॉल्टचा परिस स्पर्शही निर्णायक ठरू शकतो. पंजाबचा गोलंदाजीतील बेस्ट बेट युजवेंद्र चहलला किती सूर सापडणार, यावरदेखील बरीच गणिते अवलंबून असणार आहेत. यापूर्वी पंजाबने मुंबईला चीतपट केले, त्यावेळी श्रेयस अय्यरला तितकीच तोलामोलाची साथ देणार्या नेहल वधेराची कामगिरीदेखील येथे लक्षवेधी ठरू शकते.
‘आरसीबी’ने यापूर्वी 2009, 2011 व 2016 अशा तीन हंगामांत फायनल गाठली. मात्र, डेक्कन चार्जस, चेन्नई सुपर किंग्ज व सनरायजर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध त्यांना अनुक्रमे पराभव पत्करावे लागले आणि उपजेतेपदावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, पंजाबने 2014 मध्ये अंतिम फेरीत धडक मारली; पण त्यावेळी त्यांना ‘केकेआर’ने पराभवाची धूळ चारली होती.
भारत-पाकिस्तान या कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत सामना होणार असताना ज्याप्रमाणे मौका मौकाच्या जाहिराती टीव्हीवर झळकतात; पण अंतिमत: पाकिस्तानच्या पदरी निराशाच येते, तीच गत ‘आयपीएल’ स्पर्धेत ‘आरसीबी’ची होते, असे आजवरच्या वाटचालीत दिसून येते. दरवर्षी हा संघ ‘ई सला कप नमदे’, अर्थात यंदा कप आमचाच हा नारा घेऊन येतो; पण दरवर्षी कुठे ना कुठे त्यांची गाडी अडखळते आणि रिकाम्या हाताने त्यांना परतावे लागते. यंदा हा संघ पुन्हा एकदा नव्या जोशात, नव्या उत्साहात शड्डू ठोकून फायनलमध्ये पोहोचला असून, साहजिकच या वर्षी तरी त्यांची जेतेपदाची कसर भरून निघणार का? याकडे तमाम क्रिकेटरसिकांचे लक्ष लागून राहिलेले असणार आहे.
आजच्या ‘आयपीएल’ फायनलच्या निमित्ताने विराट कोहली, श्रेयस अय्यर व रजत पाटीदार यांना नवा विक्रम खुणावत असणार आहे. रजत पाटीदारकडे येथे शेन वॉर्न, रोहित शर्मा व हार्दिक पंड्या यांच्यानंतर आपल्या नेतृत्वाच्या पहिल्याच हंगामात विजेतपद खेचून आणणारा चौथा कर्णधार बनण्याची संधी असेल. याशिवाय, श्रेयस अय्यरकडे दोन विभिन्न संघांकडून दोन ‘आयपीएल’ जेतेपदे जिंकण्याची नामी संधी असणार आहे. सर्वात लक्षवेधी म्हणजे विराट कोहलीने येथे ‘आयपीएल’ जिंकण्यात यश मिळवले, तर त्याच्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये वन-डे वर्ल्डकप, टी-20 वर्ल्डकप व 2 चॅम्पियन्स ट्रॉफींसह ‘आयपीएल’ ट्रॉफीचाही समावेश होऊ शकणार आहे.
प्रभसिमरन सिंग : ‘पीबीकेएस’
10 सामने 360 धावा 36 सरासरी 162.16 स्ट्राईक रेट
श्रेयस अय्यर : ‘पीबीकेएस’
10 सामने 353 धावा 50.43 सरासरी 159.72 स्ट्राईक रेट
विराट कोहली : ‘आरसीबी’
10 सामने 450 धावा 56.25 सरासरी 147.54 स्ट्राईक रेट
फिल सॉल्ट : ‘आरसीबी’
8 सामने 281 धावा 40.14 सरासरी 177.84 स्ट्राईक रेट
मार्को जॅन्सेन : ‘पीबीकेएस’
8 सामने 10 बळी 8.19 इकॉनॉमी 15.6 स्ट्राईक रेट
हरप्रीत ब्रार : ‘पीबीकेएस’
7 सामने 10 बळी 8.64 इकॉनॉमी 13.2 स्ट्राईक रेट
जोश हेझलवूड : ‘आरसीबी’
7 सामने 13 बळी 8.65 इकॉनॉमी 11.15 स्ट्राईक रेट
भुवनेश्वर कुमार : ‘आरसीबी’
10 सामने 12 बळी 9.57 इकॉनॉमी 18.5 स्ट्राईक रेट
‘आयपीएल’ स्पर्धेत आजवर 15 संघ खेळले असून, त्यातील फक्त 7 संघच किमान एकदा तरी ‘आयपीएल’ जेतेपदावर आपली मोहोर उमटवू शकले आहेत. यंदा ‘आरसीबी’ किंवा पंजाब यापैकी एक संघ जिंकेल, त्यावेळी तो ‘आयपीएल’ जेतेपद संपादन करणारा या स्पर्धेतील आठवा संघ असेल. या स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकता, पहिल्या 6 वर्षांत 5 नवे विजेते या स्पर्धेला लाभले. पुढे 2014 नंतर मात्र ‘आयपीएल’मध्ये केवळ दोनच नवे चॅम्पियन लाभले असून, यात 2016 मधील विजेते सनरायजर्स हैदराबाद व 2022 मधील गुजरात टायटन्सचा समावेश आहे.
‘आयपीएल’ स्पर्धेतील आजवरचा अनुभव पाहता युजवेंद्र चहल व श्रेयस अय्यर हे दोन खेळाडू ‘ट्रम्प कार्ड’ ठरू शकतील का, याचीही आज उत्सुकता असेल. 2013 मध्ये ‘आयपीएल’ पदार्पण करणार्या चहलने 2016 मध्ये ‘आरसीबी’तर्फे तर 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सतर्फे दोन ‘आयपीएल’ फायनल खेळले. याशिवाय, श्रेयस अय्यरने 2020 फायनलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सतर्फे नाबाद 65 धावा फटकावल्या; पण त्याची ही खेळी दिल्लीला विजय संपादन करून देऊ शकली नव्हती. गतवर्षी वेंकटेश अय्यरने ‘केकेआर’च्या ‘आयपीएल’ जेतेपदावर शिक्कामोर्तब केले, त्यावेळी हाच श्रेयस नॉन स्ट्रायकर एण्डवर होता.