

australia cricketer michael clarke diagnosed with skin cancer
2015 च्या विश्वविजेत्या कर्णधाराने शस्त्रक्रियेनंतरचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लोकांना नियमित त्वचा तपासणीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कवर त्वचेच्या कर्करोगासाठी सहावी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यावेळी त्याच्या नाकावरील एक व्रण काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. 44 वर्षीय आणि 2015 च्या विश्वविजेत्या संघाचा कर्णधार असलेल्या क्लार्कने इन्स्टाग्रामवर शस्त्रक्रियेनंतरचा एक फोटो पोस्ट करत, विशेषतः ऑस्ट्रेलियासारख्या तीव्र सूर्यप्रकाश असलेल्या देशांमधील नागरिकांना नियमित त्वचा तपासणीसाठी प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.
क्लार्कला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान 2006 मध्ये पहिल्यांदा त्वचेच्या कर्करोगाचे निदान झाले होते आणि तेव्हापासून त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. 2019 मध्ये त्याने कपाळावरील एका व्रणासह तीन नॉन-मेलानोमा व्रण शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकले होते.
2023 मध्ये त्याच्या छातीवरील ‘बेसल सेल कार्सिनोमा’ काढल्यानंतर त्याला 27 टाके घालावे लागले होते. या घटनेनंतर, त्याने जनजागृती पसरवण्यासाठी ‘ऑस्ट्रेलियन स्किन कॅन्सर फाऊंडेशन’सोबत भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाला वन-डे विश्वचषक जिंकून दिल्यानंतर, क्लार्कने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
त्वचेचा कर्करोग एक वास्तव आहे! विशेषतः ऑस्ट्रेलियामध्ये. आज माझ्या नाकावरून आणखी एक व्रण काढून टाकण्यात आला. तुमच्या त्वचेची तपासणी करून घ्या, ही एक स्नेहाची आठवण आहे. उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला. परंतु, माझ्या बाबतीत, नियमित तपासणी आणि लवकर निदान हीच गुरुकिल्ली आहे, असे क्लार्कने इन्स्टाग्रामवर नमूद केले आहे.