

MS Dhoni Retirement IPL 2026 CSK News: चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. टीमचा माजी कर्णधार आणि भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आगामी IPL 2026 सिझनमध्येही मैदानात दिसणार आहे. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) के.सी. विश्वनाथन यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण दिलं असून, धोनी IPL मधून निवृत्त होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
एका खास कार्यक्रमात बोलताना के.सी. विश्वनाथन म्हणाले, “नाही, धोनी IPL मधून निवृत्त होत नाही. तो पुढच्या सिझनमध्येही खेळणार आहे.” त्यांच्या या वक्तव्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या सिझनमध्ये चेन्नईची अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नव्हती, तरीही चाहत्यांचा विश्वास धोनीवर कायम होता.
धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, तो IPL मध्ये खेळत आहे. 2024 सिझनमध्ये त्याने कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सुपूर्द केलं असलं तरी त्याच्या उपस्थितीमुळे संघाला स्थैर्य मिळालं. धोनीने मागील सिझनमध्ये 14 सामन्यांत 196 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राइक रेट थोडा कमी झाला असला तरी मैदानावर त्याची रणनीती आणि नेतृत्व आजही सीएसकेसाठी महत्वाचं आहे.
चेन्नई सुपर किंग्सने IPLच्या इतिहासात पाच वेळा विजेतेपद पटकावलं आहे आणि त्या सर्व विजयांचं नेतृत्व धोनीनेचं केलं आहे. त्याच्या नेतृत्वात संघ जवळजवळ प्रत्येक सिझनमध्ये प्लेऑफपर्यंत पोहोचला. मात्र धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर संघाच्या कामगिरीत थोडी घसरण दिसली. तरीही धोनी आजही चेन्नईसाठी महत्त्वाचा खेळाडू मानला जात आहे.
आता सीएसकेला 2026 सिझनमध्ये परत फॉर्मात येण्याची आणि पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्याची अपेक्षा आहे. आणि चाहत्यांना खात्री आहे की “जिथे धोनी आहे, तिथे चमत्कार नक्की होतो!”