

Abhishek Nayar KKR Head Coach replaces Chandrakant Pandit
कोलकाता : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) च्या आगामी हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders - KKR) फ्रँचायझीने एका महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबईचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि यशस्वी प्रशिक्षक अभिषेक नायर यांची 'केकेआर'च्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रँचायझी व्यवस्थापनाने गेल्याच आठवड्यात नायर यांना या निर्णयाबद्दल कळवले असून, लवकरच यासंबंधीची अधिकृत घोषणा करण्यात येईल.
यापूर्वी, अभिषेक नायर यांनी भारतीय संघाचे सहायक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. ते या पदावरून दूर झाल्यानंतर मागील वर्षी ते 'केकेआर'च्या सपोर्ट स्टाफमध्ये दाखल झाले होते. 'केकेआर'सोबत काम करण्याचा त्यांचा पूर्वीचाही अनुभव आहे. ते संघाच्या युवा आणि अकादमीतील खेळाडूंना घडवण्यामध्ये 'पडद्यामागचे हिरो' म्हणून महत्त्वाचे कार्य करत होते, ज्यामुळे फ्रँचायझीमध्ये त्यांची प्रतिमा अत्यंत सकारात्मक आहे.
नायर यांच्या नियुक्तीमुळे 'केकेआर'ने आपले संघ व्यवस्थापन अधिक मजबूत केले आहे. फ्रँचायझीने मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्याशी संबंध तोडल्यानंतर, त्यांच्या जागी नायर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. संघ व्यवस्थापनाला विश्वास आहे की, नायर यांची खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची आणि युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार करण्याची क्षमता संघाला पुनरुज्जीवित करेल.
आयपीएल २०२५ चा हंगाम 'केकेआर'साठी निराशाजनक ठरला होता. या संघाने १४ साखळी सामन्यांपैकी केवळ पाच सामन्यांत विजय मिळवला, ज्यामुळे त्यांना प्ले-ऑफसाठी पात्र ठरता आले नाही. या खराब कामगिरीनंतर संघ व्यवस्थापनाने प्रशिक्षक मंडळात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला.
अभिषेक नायर हे मुंबई क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. क्रिकेटमधील त्यांचा व्यापक अनुभव आणि खेळाडू म्हणून त्यांची ओळख फ्रँचायझीसाठी मौल्यवान ठरेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 'केकेआर' आयपीएल २०२६ च्या हंगामात आपली कामगिरी सुधारून पुन्हा एकदा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून उभा राहण्यास उत्सुक आहे.