

IPL 2026 Auction
नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेच्या तयारीला सुरुवात झाली असून, खेळाडूंच्या लिलावाची तारीख जवळजवळ निश्चित झाली आहे. २०२६ चा लिलाव डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता असून, १३ ते १५ डिसेंबर ही संभाव्य तारीख निश्चित केली जात आहे.
बीसीसीआयशी झालेल्या चर्चेनंतर फ्रँचायझी सूत्रांनी ही माहिती दिली. लिलावाचे वेळापत्रक लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलकडून अजून अंतिम व्हायचे असले तरी, या तारखांवर विचार सुरू आहे.
मागील दोन आयपीएल लिलाव दुबई (२०२३) आणि सौदी अरेबियातील जेद्दाह (२०२४) येथे परदेशात पार पडले होते. मात्र, यंदाचा मिनी-लिलाव परदेशात घेण्याबाबत सध्या तरी कोणतेही संकेत नाहीत. त्यामुळे बीसीसीआय हा लिलाव भारतातच आयोजित करण्याचा निर्णय घेऊ शकते, असे फ्रँचायझी सूत्रांचे म्हणणे आहे. यावरही लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
आयपीएल लिलावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली खेळाडूंना कायम ठेवण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत सर्व फ्रँचायझींना ज्या खेळाडूंना संघातून रिलीज करायचे आहे, त्यांची यादी सादर करावी लागेल.
मागील हंगामात तळात राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या संघांमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) डेव्हॉन कॉनवे याला सोडले जाण्याची शक्यता आहे. तसेच दीपक हुडा, विजय शंकर, राहुल त्रिपाठी, सॅम करन यांसारखे खेळाडूदेखील रिलीज लिस्टमध्ये असू शकतात. आर अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीनंतर पाच वेळा आयपीएल विजेत्या सीएसकेकडे आधीच त्यांच्या बजेटमध्ये अतिरिक्त ९.७५ कोटी आहेत.
जर फ्रँचायझी कर्णधारासाठी व्यवहार करू शकली नाही तर संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सच्या रिलीज यादीत अव्वल स्थानावर असेल. वानिंदू हसरंगा आणि महेश टिक्षणा यांना सोडण्याची चर्चा देखील झाली होती, परंतु कुमार संगकाराच्या मुख्य प्रशिक्षकपदी पुनरागमनानंतर ही योजना बदलू शकते.