

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि करोडो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या महेंद्रसिंग धोनीने आता आपल्या ‘कॅप्टन कूल’ या प्रसिद्ध टोपण नावावर कायदेशीर हक्क प्रस्थापित केला आहे. धोनीने हे नाव ट्रेडमार्क म्हणून नोंदवण्यासाठी अर्ज केला होता, जो आता स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे ‘कॅप्टन कूल’ हे केवळ टोपण नाव नसून धोनीचा अधिकृत ब्रँड बनला आहे.
धोनीने हा ट्रेडमार्क विशेषतः क्रीडा प्रशिक्षण, कोचिंग सेवा आणि प्रशिक्षण केंद्रांशी संबंधित व्यावसायिक वापरासाठी मिळवला आहे. ट्रेड मार्क्स रजिस्ट्री पोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार, धोनीचा अर्ज स्वीकारण्यात आला असून तो 16 जून 2025 रोजी अधिकृत ट्रेडमार्क जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.
मैदानावर अत्यंत तणावाच्या क्षणीही शांत आणि संयमी राहण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे चाहते आणि समालोचकांनी त्याला ‘कॅप्टन कूल’ हे नाव दिले होते. 2007 चा टी-20 विश्वचषक, 2011 चा एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी यांसारख्या मोठ्या स्पर्धा जिंकताना त्याच्या याच या समयोचित गुणाचे दर्शन घडले होते.
धोनीच्या वकील मानसी अग्रवाल यांनी सांगितले की, हा कायदेशीर प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला, ट्रेडमार्क रजिस्ट्रीने कायद्याच्या कलम 11(1) अंतर्गत यावर आक्षेप घेतला होता, कारण या नावाने आधीच एक नोंदणी अस्तित्वात होती.
मात्र, धोनीच्या कायदेशीर टीमने प्रभावी युक्तिवाद करत सांगितले की, ‘कॅप्टन कूल’ या नावाला धोनीच्या दीर्घकालीन आणि व्यापक वापरामुळे एक विशेष ओळख प्राप्त झाली आहे. हे नाव आता पूर्णपणे धोनीच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडले गेले आहे. अखेरीस हा युक्तिवाद मान्य झाला आणि धोनीच्या नावाची अधिकृत नोंदणी झाली. या निर्णयामुळे धोनीने मैदानाप्रमाणेच व्यावसायिक क्षेत्रातही एक मोठी खेळी जिंकली आहे.