

भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर भारतीय संघाला 5 गडी राखून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता दोन्ही संघ 2 जुलैपासून बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाले आहेत. या महत्त्वाच्या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या अंतिम 11 खेळाडूंची (Playing XI) घोषणा केली असून, संघात पुन्हा एकदा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला स्थान देण्यात आलेले नाही.
जोफ्रा आर्चरला संघात स्थान न देण्यामागे दुखापत हे कारण नसून, कौटुंबिक आपत्कालीन परिस्थिती असल्याचे सांगितले जात आहे. आर्चर 1 जुलै रोजी एजबॅस्टन येथील सराव सत्रात इंग्लंड संघात सामील होणार होता, मात्र कौटुंबिक कारणामुळे आता ते शक्य होणार नाही. त्यामुळे, त्याच्या पुनरागमनाला पुन्हा एकदा विलंब झाला आहे. विशेष म्हणजे, चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आर्चर कसोटी संघात परतला आहे. 30 वर्षीय आर्चरने आपला अखेरचा कसोटी सामना फेब्रुवारी 2021 मध्ये भारताविरुद्ध खेळला होता. 2019 मध्ये कसोटी पदार्पण केल्यापासून त्याने इंग्लंडसाठी आतापर्यंत केवळ 13 कसोटी सामने खेळले आहेत.
गेल्या आठवड्यात आर्चरने चार वर्षांत प्रथमच कौंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्स संघाकडून डरहॅमविरुद्ध प्रथम श्रेणी सामना खेळला होता. आता आर्चर तिसऱ्या कसोटीतून संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने पहिल्या कसोटीतील संघच कायम ठेवला आहे. कर्णधार बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली, दुसऱ्या कसोटीतही विजयाची लय कायम राखण्याकडे इंग्लंड संघाचे लक्ष असेल.
इंग्लंडच्या संघाची घोषणा झाल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष भारतीय संघाकडे लागले आहे. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर, संघ व्यवस्थापनाकडून अंतिम 11 खेळाडूंमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, एजबॅस्टनमध्ये भारतीय संघ कोणत्या 11 खेळाडूंसह मैदानात उतरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.