

Mohammad Amir IPL : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आता पाकिस्तानचा नागरिक राहिला नाही. मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद आमिर आता ब्रिटीश नागरिक झाला आहे. त्यामुळे आता तांत्रिकदृष्ट्या मोहम्मद आमिर जगातील सर्वात मोठी प्रीमियर लीग अर्थात आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमिरला आता युकेचा पासपोर्ट मिळाल्यामुळं त्याला भारतात येणं आणि आयपीएल खेळणं सोयीचं होणार आहे.
मोहम्मद आमिरची पत्नी नरजिफ खातून ही ब्रिटिश नागरिक आहे. त्यामुळं आमिरला देखील युकेची नागरिकता मिळाली आहे. मोहम्मद आमिरने काही वर्षापूर्वी ब्रिटिश नागरिकता मिळवण्यासाठी अर्ज केला होता. आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याला युकेचा पासपोर्ट मिळाला आहे. त्याचबरोबर आमिरसाठी आता आयपीएलचे दरवाजे देखील उघडले आहेत. तो आता आयपीएल खेळणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
आमिर आता पाकिस्तानी नागरिक नाही तर ब्रिटिश नागरिक म्हणून आयपीएलसाठी नोंदणी करू शकतो. जर आमिर ऑक्शनमध्ये शॉर्टलिस्ट झाला आणि कोणत्या संघाने त्याच्यावर बोली लावली तर तो आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो.
आयपीएलच्या पहिल्या हंगामात अनेक पाकिस्तानी खेळाडू खेळले होते. मात्र २००९ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली होती. मात्र २०१२ मध्ये पाकिस्तानसाठी दीर्घकाळ खेळलेला अष्टपैलू खेळाडू अजहर महमूद आयपीएलमध्ये खेळला होता. तो २०१२ ते २०१५ मध्ये जवळपास २३ आयपीएल सामने खेळला होता. महमूद हा देखील ब्रिटिश नागरिक झाला होता. त्यानंतर त्याला आयपीएल खेळता आली होती.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर फार आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला नाही. त्याने पीसीबीशी संघर्षानंतर निवृत्ती घेतली. तो पाकिस्तान सुपर लीग खेळतोय. आमिरने पाकिस्तानकडून ३६ कसोटी, ६१ वनडे आणि ६२ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर ११९ कसोटी, ८१ वनडे तर ७१ टी २० विकेट्स आहेत.
जरी आमिर ब्रिटिश नागरिक झाला असला तरी गेल्या काही काळातील संघाचा कल पाहता मोहम्मद आमिरला आयपीएल खेळण्याची संधी मिळेल याची फार शक्यता नाही. एकरत त्याचा करंट फॉर्म, वय आणि वादग्रस्त व्यक्तीमत्व पाहता आयपीएल संघ आ बैल मुझे मार असं करण्याची शक्यता नाही. नुकतेच केकेआरचे बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहीम प्रकरणात हात पोळला आहे. सनराईजर्स हैदराबाद देखील परदेशातील एका लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूला खेळवल्यावरून टीकेचा धनी झाला होता. त्यामुळं ही जोखीम कोणी उचलेल असे वाटत नाही.