Sakib Hussain | 72 चेंडूत एकही षटकार नाही! IPL मध्ये 'या' गोलंदाजाचा 'दरारा', टीम इंडियाला मिळाला आणखी एक 'बुमराह'?

सनरायझर्स हैदराबादने ३० लाख रुपयांना खरेदी केलेला वेगवान गोलंदाज गाजवतोय आयपीएल

Sakib Hussain IPL 2026
सनरायझर्स हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज साकिब हुसेन.Pudhari
Published on
Updated on

Sakib Hussain IPL 2026

हैदराबाद : क्रिकेटमधील टी-२० फॉर्मेट म्हणजे गोलंदाजांची 'धुलाई' आणि फलंदाजांची 'दादागिरी' हा एक अलिखित नियमच आहे. प्रेक्षकांचे मनमुराद मनोरंजन करणारा हा खेळ गोलंदाजांची सत्त्वपरीक्षा पाहणारा ठरतो. नियमांपासून खेळपट्टीपर्यंत सारं काही फलंदाजांसाठीची पर्वणी असते, तरीही एखादा चिवट गोलंदाज हा चक्रव्यूह भेदतो आणि आपलं अस्तित्व सिद्ध करतो... हे सारं सांगण्याचे कारण म्हणजे यंदाच्या आयपीएलमध्ये एका गोलंदाजाने तब्बल ७२ चेंडू टाकले असून एकही फलंदाज त्याला षटकार ठोकू शकलेला नाही.

कोण आहे साकिब हुसेन?

आयपीएल २०२६ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) पदार्पण करणाऱ्या बिहारच्या साकिब हुसेनने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या धारदार गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. साकिबने आपल्या पहिल्याच सामन्यात २४ धावा देत ४ बळी टिपले आणि एक नवा इतिहास रचला. साकिब हा बिहारमधील गोपाळगंजचा रहिवासी आहे. २०२६ च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने त्याला ३० लाख रुपयांना खरेदी केले. २०२४ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) त्याला संघात घेतले होते, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याला संघातून मुक्त करण्यात आले होते.


Sakib Hussain IPL 2026
Hardik Pandya Angry MIvsPBKS: आता निर्णय घ्यावाच लागेल... कर्णधार पांड्या भडकला, तीन दिग्गजांपैकी कोण हार्दिकच्या रडारवर?

दिग्गजांच्या पंगतीत स्थान

२१ वर्षीय साकिब हुसेन आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात ४ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा सातवा खेळाडू ठरला आहे. त्याने पदार्पणात सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्यांच्या यादीत अश्वनी कुमारसह संयुक्त पाचवे स्थान पटकावले . या यादीत अलझारी जोसेफ (६/१२), अँड्र्यू टाय (५/१७) आणि शोएब अख्तर (४/११) यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.


Sakib Hussain IPL 2026
Jasprit Bumrah First Wicket: एका विकेटचं मुल्य २६ लाखाचं... बुमराहनं ३२५ दिवसांनी खातं उघडलं, जाणून घ्या भन्नाट कॅलक्युलेशन

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी

साकिबने २०२२-२३ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बिहारकडून टी-२० पदार्पण केले. अवघ्या १७ व्या वर्षी त्याने आपल्या दुसऱ्याच सामन्यात २० धावा देत ४ बळी घेतले होते. २०२५-२६ च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध ४१ धावांत ६ बळी घेत आपली पहिली 'फाईव्ह विकेट हॉल' नोंदवली होती. त्याचे बिहारमधील प्रशिक्षक विनायक सामंत म्हणतात, "साकिब हा अतिशय दर्जेदार वेगवान गोलंदाज आहे. त्याच्याकडे चांगला वेग असून त्याच्याकडे 'स्लोअर वन' देखील तितकेच प्रभावी आहे. तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि टी-२० स्पेशालिस्ट आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान वरुण एरॉन खास त्याला पाहण्यासाठी रांचीला आला होता आणि त्याच्या कामगिरीवर खुश होऊनच हैदराबादने त्याला लिलावात घेतले."


Sakib Hussain IPL 2026
Jasprit Bumrah IPL 2026 | पाच सामन्यांनंतरही जसप्रीत बुमराहची विकेटची पाटी कोरीच! माजी क्रिकेटपटू आर. अश्विनने सांगितले कारण

७२ चेंडूत एकही षटकार नाही

यंदाच्या आयपीएलमध्ये साकिब हुसेनने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. एकीकडे सर्वच गोलंदाजांची धुलाई सुरू असताना साकिबने आतापर्यंत टाकलेल्या ७२ चेंडूत एकही षटकार दिलेला नाही. यावरून त्याचे फलंदाजांना रोखण्याचे कसब स्पष्ट होते. आता आयपीएलमधील पुढील सामन्यांमध्ये सर्वांची नजर साकिबवर असणार आहे. आतापर्यंतच्या त्याच्या कामगिरीमुळे टीम इंडियाला आणखी एक बुमराह मिळाला आहे, अशी चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news