

Mitchell Starc Josh Hazlewood ICC Final Highest 10th wicket partnership
लॉर्ड्सवर सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड या जोडीने एक असा पराक्रम केला आहे, ज्याने क्रिकेट इतिहासातील 50 वर्षे जुना विक्रम मोडीत निघाला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 207 धावांवर संपुष्टात आला, पण या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात स्टार्क आणि हेजलवूडच्या झुंजार भागीदारीचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या या खेळीमुळे द. कांगारूना आफ्रिकेसमोर विजयासाठी 282 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवता आले.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. त्यांनी 148 धावांवर 9 गडी गमावले. अशा परिस्थितीत संघ लवकरच ऑलआऊट होईल असे वाटत होते. पण स्टार्क आणि हेजलवूड ही जोडीने केवळ संघाचा डाव सावरला नाही, तर 10व्या विकेटसाठी तब्बल 59 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. या भागीदारीने ऑस्ट्रेलिया संघ मजबूत स्थितीत आला.
स्टार्क आणि हेजलवूड यांच्या नावावर आता ICC स्पर्धेच्या कोणत्याही फायनल सामन्यात 10व्या विकेटसाठी सर्वात मोठी तसेच 50 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचेच दिग्गज गोलंदाज डेनिस लिली आणि जेफ थॉमसन यांच्या नावावर होता. त्यांनी 1975 सालच्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 10व्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली होती.
मिचेल स्टार्क-जोश हेजलवूड : 59 धावा : विरुद्ध दक्षिण आफ्रिका : WTC फायनल 2025
डेनिस लिली-जेफ थॉमसन : 41 धावा : विरुद्ध वेस्ट इंडिज : वनडे वर्ल्ड कप फायनल, 1975
बलविंदर संधू-सैयद किरमानी : 22 धावा : विरुद्ध वेस्ट इंडिज : वनडे वर्ल्ड कप फायनल, 1983
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 282 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकेला इतिहास रचण्याची संधी आहे. जर त्यांनी हे लक्ष्य यशस्वीरीत्या पार केले, तर ICC स्पर्धेच्या कोणत्याही फायनल सामन्यात 275 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारा तो पहिला संघ ठरेल. याआधी, 2011 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे मैदानावर श्रीलंकेविरुद्ध 275 धावांचे लक्ष्य गाठले होते.
स्टार्क आणि हेजलवूडच्या विक्रमी भागीदारीने सामन्यात नवसंजीवनी फुंकली. आता द. आफ्रिकेचे फलंदाज या आव्हानाचा कसा सामना करतात याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. लॉर्ड्सच्या मैदानावरचा हा अंतिम सामना आता खऱ्या अर्थाने रोमांचक अवस्थेत पोहोचला आहे.