

Finn Allen fastest century Major League Cricket 2025
मेजर लीग क्रिकेट 2025 चा पहिला सामना शुक्रवारी (13 जून) ऑकलंड कोलिजियमवर सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यात खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडचा आक्रमक सलामीवीर फिन ॲलनने वादळी फलंदाजी करत क्रिकेट इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
ॲलनने 296.08 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि 51 चेंडूत 151 कुटल्या. या खेळीत त्याने 19 षटकार आणि 5 चौकार ठोकले. अशाप्रकारे, ॲलनने फक्त 24 चेंडूत चौकार आणि षटकारांच्या जोरावर 134 धावा फटकावल्या.
ॲलन हा एका टी20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजचे माजी सलामीवीर ख्रिस गेल आणि एस्टोनियाचा साहिल चौहान यांच्या नावावर संयुक्तपणे होता. या दोघांनी प्रत्येकी 18 षटकार मारले होते. मात्र, ॲलनने एमएलसीमध्ये वॉशिंग्टन फ्रीडमविरुद्ध 19 षटकार ठोकून हा विक्रम मोडीत काढला.
ॲलनने केवळ षटकारांचा विक्रमच केला नाही, तर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 150 धावा करणारा पहिला खेळाडूही ठरला आहे. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सकडून खेळताना एलनने फक्त 49 चेंडूत 150 धावांचा टप्पा गाठला. याबाबतीत ॲलनने डेवाल्ड ब्रेव्हिसला मागे टाकले. 2022 मध्ये नाईट्सविरुद्धच्या सामन्यात टायटन्सकडून खेळताना ब्रेव्हिसने 52 चेंडूत 150 धावा केल्या होत्या.
अॅलनने 34 चेंडूत शतक पूर्ण केले, जे या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठरले आहे. याशिवाय, हे न्यूझीलंडच्या कोणत्याही खेळाडूने केलेले सर्वात जलद टी-20 शतक देखील आहे. यापूर्वी मार्टिन गुप्टिलने 2018 मध्ये वॉर्सेस्टरशायरकडून खेळताना नॉर्थम्प्टनशायरविरुद्ध 35 चेंडूत शतक पूर्ण केले होते.
अॅलनने मेजर लीग क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रमही केला. यापूर्वी हा विक्रम निकोलस पूरनच्या नावावर होता. या कॅरेबियन खेळाडूने 2023 मध्ये एमआय न्यू यॉर्ककडून खेळताना 55 चेंडूत नाबाद 137 धावा केल्या होत्या.