

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी इंग्लंड दौऱ्यावर असताना अचानक भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करत असून, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील या संघावर मालिका जिंकण्याचे दडपण आहे. मात्र, गंभीर यांना कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे मायदेशी परतावे लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंभीर यांच्या आई, सीमा गंभीर यांना 11 जून 2025 रोजी हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत कुटुंबीयांनी गंभीर यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी त्वरित भारतात परतण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांच्या आईची प्रकृती स्थिर असून, त्या धोक्याबाहेर आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
गंभीर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) याबाबत माहिती दिली असून, ते मंगळवारी (17 जून) पुन्हा इंग्लंडला रवाना होतील. याचा अर्थ, ते पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी (20 जून) तीन दिवस आधी संघाशी जोडले जातील.
दरम्यान, गंभीर यांच्या अनुपस्थितीत इंग्लंड दौऱ्यातील भारताच्या एकमेव सराव सामन्याचे नेतृत्व फलंदाज प्रशिक्षक सितांशु कोटक आणि गोलंदाज प्रशिक्षक मॉर्न मोर्केल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याच्यावर आता अधिक जबाबदारी येणार आहे. गंभीर 17 जूनपर्यंत पुन्हा संघात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे 20 जूनपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी ते संघात परततील अशी अपेक्षा आहे.
गंभीर यांनी इंग्लंड दौऱ्याच्या तयारीसाठी बंद दरवाजामागे सराव सामना आयोजित केला होता, जेणेकरून संघाच्या रणनीती गुप्त राहतील. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमुळे संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंवर अतिरिक्त जबाबदारी आली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांच्या निवृत्तीनंतर हा भारताचा पहिलाच मोठा कसोटी दौरा असल्याने गंभीर यांच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या तयारीवर परिणाम होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.