

Mirabai Chanu Silver Medal: जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चानूने महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावत भारताचा तब्बल 28 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. 1998 नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पदक मिळाले नव्हते. मीराबाईच्या कामगिरीमुळे अखेर हा प्रदीर्घ प्रतीक्षेचा काळ संपला.
मीराबाई चानूने स्नॅच प्रकारात सुरुवातीपासूनच सावध आणि नियोजनबद्ध खेळ केला. तिने प्रत्येक प्रयत्नात दोन किलोने वजन वाढवण्याची रणनीती आखली होती.
पहिल्या प्रयत्नात तिने 83 किलो वजन यशस्वीपणे उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 85 किलो आणि तिसऱ्या प्रयत्नात 87 किलो वजन उचलत तिने स्नॅचमध्ये आपली स्थिती मजबूत केली. 87 किलो वजन उचलत ती स्नॅचमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिली.
क्लीन अँड जर्कमध्ये मीराबाईने 107 किलो वजनापासून सुरुवात केली आणि पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वीपणे उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नासाठी तिने थेट चार किलोने वजन वाढवत 111 किलो वजन उचलले.
या निर्णयामागेही तिची रणनीती होती. इंडोनेशियाची विजायना लुलुक डायना ही तिची पदकाच्या शर्यतीतील प्रमुख प्रतिस्पर्धी होती. डायना पहिल्या प्रयत्नात 103 किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली होती. त्यामुळे मीराबाईने अनावश्यक जोखीम न घेता आपली आघाडी कायम ठेवण्यावर भर दिला.
डायनाने दुसऱ्या प्रयत्नात 103 किलो वजन उचलत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात ती 107 किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली. त्यामुळे तिचा एकूण स्कोअर 191 किलोवरच राहिला.
दरम्यान, मीराबाईने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क मिळून एकूण 198 किलो वजन उचलले होते. त्यामुळे ती दुसऱ्या स्थानावर होती, तर डायना 191 किलोसह तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
यामुळे मीराबाईचे रौप्यपदक निश्चित झाले. पदकासाठी आवश्यक कामगिरी तिने दुसऱ्याच प्रयत्नात पूर्ण केली होती. त्यामुळे क्लीन अँड जर्कमधील तिसरा प्रयत्न करण्याची तिला गरज राहिली नाही. अनावश्यक जोखीम न घेता तिने तिसरा प्रयत्न न करण्याचा निर्णय घेतला.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये भारताला यापूर्वी 1998 मध्ये पदक मिळाले होते. बँकॉक येथे झालेल्या त्या स्पर्धेत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती कर्णम मल्लेश्वरीने महिलांच्या 63 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले होते.
त्यानंतरच्या सहा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळाले नव्हते. तब्बल 28 वर्षांनंतर मीराबाई चानूने हा दुष्काळ संपवत भारताच्या नावावर रौप्यपदकाची नोंद केली.