Mirabai Chanu | भारोत्तोलनातील सुवर्णकन्या

Mirabai Chanu |
Mirabai Chanu | भारोत्तोलनातील सुवर्णकन्या
Published on
Updated on

सुचित्रा दिवाकर

वेटलिफ्टिंग हे अनेक वर्षे पुरुषांच्या मक्तेदारीच क्षेत्र मानले जात होते. आजही भारतात या क्रीडा प्रकाराकडे वळणार्‍या तरुणींची संख्या कमीच आहे. अशा स्थितीत ईशान्येकडील मणिपूरसारख्या राज्यात एका दुर्गम भागातून आलेल्या मीराबाई चानू या वेटलिफ्टरने भारोत्तलनात जो इतिहास रचला आहे तो अद्वितीय आहे. यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅट्‌ट्रिक साधत तिने पुन्हा एकदा देशाचे नाव उंचावले आहे. स्पर्धा सुरू होण्याच्या बरोबर एक रात्र आधी तिने स्वतः भारतीय तिरंग्याच्या रंगांच्या रिबनपासून फुलपाखराच्या आकाराची हेअर क्लिप तयार केली होती. भारतासाठी काहीतरी विशेष करावे, या भावनेतून तिने ही क्लिप डोक्यात लावली होती. जेव्हा पोडियमवर राष्ट्रगीत वाजले आणि तिरंगा फडकला, तेव्हा मीराबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हा क्षण संपूर्ण देशासाठी अत्यंत भावुक करणारा होता.

भारताची महान भारोत्तोलक (वेटलिफ्टर) साइखोम मीराबाई चानूने ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. महिलांच्या ४८ किलो गटात सुवर्णपदक पटकावून तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅट्‌ट्रिक साधत इतिहास रचला आहे. अपार मेहनत, सामर्थ्य, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर पुरुषी मक्तेदारी मानल्या जाणार्‍या क्षेत्रात तिने स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे. २५ वर्षांपूर्वी सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने कांस्य पदक जिंकून या क्षेत्रातील भारतीय महिलांच्या यशाची पायवाट तयार केली. ऑलिम्पिक पदक मिळवणारी ती भारताची पहिली महिला होती. तिच्या यशामुळे भारतातील महिला भारोत्तोलनाला अभूतपूर्व प्रेरणा मिळाली. नंतरच्या काळात मणिपूरच्या कुंजरानी देवी या दिग्गज खेळाडूने जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत अनेक पदके जिंकून देशाचे नाव उंचावले. त्यांच्याच यशामुळे ईशान्य भारतामधील अनेक तरुणी या खेळाकडे आकर्षित झाल्या. मीराबाई ही त्यांचीच शिष्या. टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये रौप्य पदक जिंकून आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सातत्यपूर्ण सुवर्णपदके मिळवून मीराबाई चानूने भारतीय महिला भारोत्तोलनाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. या सुवर्णकन्येचा इथवरचा प्रवास संघर्षमय आणि रंजक राहिला आहे.

मीराबाई चानूचे बालपणी भारोत्तोलक बनण्याचे कोणतेही स्वप्न नव्हते. मणिपूरमध्ये जन्मलेल्या मीराबाईला लहानपणी तिरंदाजी (आर्चरी) खेळाची भारी आवड होती. सातवी इयत्तेपर्यंत ती याच खेळात आपले भविष्य घडवण्याचा विचार करत होती; परंतु आठवीच्या पुस्तकात कुंजरानी देवी यांच्याविषयी वाचल्यानंतर तिने आपले ध्येय बदलले आणि भारोत्तोलन क्षेत्रास पसंती दिली. सुरुवातीच्या दिवसांत मीराबाईकडे तिच्या गावापासून पंचवीस किलोमीटर दूर असलेल्या इम्फाल येथील क्रीडा अकादमीत जाण्यासाठी बसचे तिकीट काढायलाही पैसे नव्हते. अशा कठीण प्रसंगी नदीवरून वाळू वाहत नेणार्‍या ट्रकचालकांनी तिला खूप मदत केली. ती रोज या ट्रकने लिफ्ट मागून सरावाच्या ठिकाणी पोहोचत असे. वैश्विक पटलावर यश मिळाल्यानंतर मीराबाईने त्याच्याविषयीचा कृतज्ञता भाव जपला आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. मीराबाईची आणखी एक फारशी माहीत नसलेली बाब म्हणजे, कितीही मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी परदेशात गेली, तरी तिला आपल्या गावाची माती आणि तिथल्या खाण्याची विशेष ओढ आहे. जेव्हा जेव्हा ती परदेशात जाते, तेव्हा आपल्यासोबत आवर्जून गावाकडचा तांदूळ आणि माती सोबत घेऊन जाते. परदेशातही ती आपल्याच गावातील तांदळाचा भात खाणे पसंत करते. संस्कृतीशी ही नाळ जोडून ठेवण्याची तिची ही साधी पण अनोखी पद्धत सर्वांचे मन जिंकून घेते.

अवघ्या बारा वर्षांची असताना मीराबाईने आपल्या सोळा वर्षांच्या भावासोबत जंगलात लाकडे गोळा केली होती. जेव्हा लाकडांचे ओझे उचलण्याची वेळ आली, तेव्हा तिच्या भावाला ते जड गेले; मात्र मीराबाईने अत्यंत सहजपणे लाकडाची ती मोठी मोळी डोक्यावर घेतली आणि डोंगराळ भागातून तब्बल दोन किलोमीटर चालत ती घरी पोहोचली. या घटनेमुळे तिच्या भावाला तिची ताकद लक्षात आली. २०२० च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मीराबाईने महिलांच्या ४९ किलो गटात रौप्य पदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. ऑलिम्पिकच्या भारोत्तोलन प्रकारात पदक जिंकणारी ती कर्णम मल्लेश्वरीनंतरची दुसरी भारतीय महिला ठरली. तिने भारताची ऑलिम्पिकमधील दीर्घकाळापासूनची पदकाची प्रतीक्षा संपवली. २०२१ च्या आशियाई भारोत्तोलन स्पर्धेत मीराबाई चानूने क्लिन अँड जर्क प्रकारात तब्बल ११९ किलो वजन उचलून जागतिक विक्रम (वर्ल्ड रेकॉर्ड) प्रस्थापित केला होता. तिचा हा विक्रम तब्बल अडीच वर्षे अजिंक्य राहिला. यावरून तिच्या अफाट ताकदीचा आणि कौशल्याचा अंदाज येतो.

लहानपणी डोंगरावरून जळाऊ लाकडे गोळा करणारी एक सामान्य मुलगी ते जागतिक पटलावर दिमाखाने वावरणारी सुवर्णकन्या हा तिचा प्रवास प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. तिच्या या प्रवासात गरिबी आणि अपुरी साधनसामग्री हे मोठे अडथळे ठरले. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाईचा मुकाबला कोणत्याही प्रतिस्पर्ध्याशी नसून स्वतःच्याच विक्रमांशी होता. तिने स्नॅच प्रकारात ८५ किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेत नवीन विक्रम केला. त्यानंतर क्लिन अँड जर्क प्रकारात १०५ किलो वजन उचलत तिने एकूण १९० किलो वजनाची नोंद करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. रौप्य पदक मिळवणार्‍या नायजेरियाच्या खेळाडूने तिच्यापेक्षा तब्बल २२ किलो वजन कमी उचलले होते. खेळादरम्यान सुरुवातीला तिला काही प्रयत्नांमध्ये अपयश आले; परंतु एका खर्‍या चॅम्पियनप्रमाणे तिने जोरदार कमबॅक करत पहिल्याच प्रयत्नात इतिहास रचला.

मीराबाई चानूची शारीरिक बांधणी लहान असली, तरी वजनाखाली स्वतःला झोकून देताना तिची लवचिकता आणि पकड अचूक असते. रॉड उचलताना तिचे पाय, पाठ आणि हातांच्या स्नायूंचे संतुलन अचूक वेळेत जुळून येते, ज्यामुळे ती स्वतःच्या वजनापेक्षा अडीच ते तीन पट अधिक वजन लीलया उचलू शकते. तिच्या सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये कधीकधी तांत्रिक अडचणी आल्या, तरी दुसर्‍या किंवा तिसर्‍या प्रयत्नात स्वतःला सावरून अचूक वजन उचलण्याची तिची कला थक्क करणारी आहे.

खेळाच्या दीर्घ प्रवासात मीराबाईला अनेकदा गंभीर दुखापतींचा सामना करावा लागला आहे. विशेषतः पाठीच्या आणि खांद्याच्या दुखापतींमुळे तिचे करिअर धोक्यात आले होते; परंतु तिने कधीही हार मानली नाही. रिहॅबिलिटेशन, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य विश्रांती घेत तिने प्रत्येक वेळी मैदानावर धमाकेदार पुनरागमन केले आहे. ऑलिम्पिकमधील पराभवाचे किंवा दुखापतींच्या वेदनेचे ओझे बाळगण्याऐवजी तिने नेहमी आपल्या सरावावर आणि आत्मविश्वासावर लक्ष केंद्रित केले आहे. रोज सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी सुरू होणारा तिचा सराव आणि तासन्‌ तास जड वजन उचलत घामाच्या धारा गाळणे हा शिरस्ता तिने सदोदित जपला आहे.

सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिने माध्यमांशी बोलताना एका वाक्यात आपल्या त्यागाची साक्ष दिली. हसतमुखाने ती म्हणाली, 'जल्दी-जल्दी करो, मैंने दो दिन से कुछ नहीं खाया है!' वजनी खेळांमध्ये वजन नियंत्रणात ठेवणे किती कठीण असते, याची ही प्रचिती होती. खेळाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यासाठी तिने दोन दिवस अन्नाचा त्याग केला होता. याशिवाय, स्पर्धा सुरू होण्याच्या बरोबर एक रात्र आधी तिने स्वतः भारतीय तिरंग्याच्या रंगांच्या रिबनपासून फुलपाखराच्या आकाराची हेअर क्लिप तयार केली होती. भारतासाठी काहीतरी विशेष करावे, या भावनेतून तिने ही क्लिप डोक्यात लावली होती. जेव्हा पोडियमवर राष्ट्रगीत वाजले आणि तिरंगा फडकला, तेव्हा मीराबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हा क्षण संपूर्ण देशासाठी अत्यंत भावुक करणारा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news