

los angeles olympics 2028 cricket event begin on 12 july
लॉस एंजेलिस : ऑलिम्पिक 2028 मध्ये क्रिकेटच्या समावेशाबाबत एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक आणि ठिकाण आता निश्चित झाले असून, क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
क्रिकेट या खेळासाठी ही एक ऐतिहासिक घटना आहे, कारण तब्बल 128 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करत आहे. अखेरचे क्रिकेट सामने 1900 साली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळवण्यात आले होते. त्यावेळी केवळ ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स या दोनच संघांनी सहभाग घेतला होता. त्या ऐतिहासिक सामन्यात ग्रेट ब्रिटनने विजय मिळवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. तेव्हापासून क्रिकेट ऑलिम्पिकच्या पटलावरून दूर होते. आता लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमुळे क्रिकेटला पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑलिम्पिक 2028 मधील क्रिकेटचे सामने लॉस एंजेलिसपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोमोना शहरातील ‘फेअरग्राउंड्स स्टेडियम’मध्ये आयोजित केले जातील. या स्पर्धेला 12 जुलै 2028 रोजी सुरुवात होईल, तर सुवर्णपदकासाठीचे अंतिम सामने 20 आणि 29 जुलै रोजी खेळवले जातील. एकूण 16 दिवस क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
आता पुरुष आणि महिला गटात कोणते संघ सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अर्थात, त्यासाठी क्रीडाप्रेमींना अजून तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतीय पुरुष आणि महिला संघ पदकाचे प्रबळ दावेदार म्हणून या स्पर्धेत सहभागी होतील, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या स्पर्धेचे स्वरूप अत्यंत नियोजनबद्ध ठेवण्यात आले आहे. पुरुष आणि महिला या दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी 6 संघ सहभागी होतील.
दोन्ही गटांतील संघंमध्ये मिळून एकूण 180 खेळाडू या ऐतिहासिक ऑलिम्पिक स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावतील. स्पर्धेच्या स्वरूपानुसार, बहुतांश दिवशी दोन सामने खेळवले जातील. तथापि, 14 आणि 21 जुलै रोजी एकही सामना खेळवला जाणार नाही.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) 2028 च्या ऑलिम्पिकसाठी पाच नवीन खेळांना मंजुरी दिली होती. यामध्ये क्रिकेटसह बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश या खेळांचा समावेश आहे.
भारतातील क्रिकेटची अफाट लोकप्रियता हे क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळण्यामागील एक प्रमुख कारण मानले जाते. क्रिकेटच्या समावेशामुळे ऑलिम्पिकमधील खेळांची विविधता आणि रोमांच अधिक वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.