

आशिया चषक स्पर्धेतील यूएईविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी ९ गडी राखून दणदणीत विजय मिळाला. या सामन्यात चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने महत्त्वाची भूमिका बजावली.
भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये दीर्घकाळानंतर पुनरागमन करणाऱ्या कुलदीपने केवळ २.१ षटकांत युएईच्या ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाकावला. ज्यामुळे यूएईचा संघ १३.१ षटकांत अवघ्या ५७ धावांवर गारद झाला. भारतीय संघाने हे लक्ष्य केवळ ४.३ षटकांत १ गडी गमावून आरामात गाठले. या दमदार कामगिरीच्या जोरावर कुलदीप यादवने एका विशेष विक्रमामध्ये रविचंद्रन अश्विनला मागे टाकले आहे.
कुलदीप यादव २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर या फॉरमॅटमधील आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. आशिया चषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानेही आपल्या खेळाने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली.
यूएईविरुद्धच्या सामन्यात कुलदीपने एकाच षटकात तीन बळी टिपले. तर सामन्यात एकूण ४ विकेट्स मिळवल्या. अशाप्रकारे तो विदेशात भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रविचंद्रन अश्विनच्या पुढे गेला.
कुलदीपने आतापर्यंत विदेशात २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, यादरम्यान त्याने ११.१५ च्या सरासरीने एकूण ५२ बळी घेतले आहेत, तर अश्विनने ५० बळी घेतले होते. या यादीत अर्शदीप सिंग पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने विदेशात आतापर्यंत ७१ टी-२० आंतरराष्ट्रीय बळी घेतले आहेत.
अर्शदीप सिंग : ७१ बळी (४५ सामने)
हार्दिक पंड्या : ६३ बळी (६७ सामने)
जसप्रीत बुमराह : ६२ बळी (४२ सामने)
भुवनेश्वर कुमार : ५६ बळी (५३ सामने)
कुलदीप यादव : ५२ बळी (२५ सामने)
रविचंद्रन अश्विन : ५० बळी (४४ सामने)
यूएईविरुद्धच्या सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाजीसाठी कुलदीप यादवला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर त्याने आपल्या कामगिरीचे श्रेय फिटनेस प्रशिक्षक एड्रियन यांना दिले. कुलदीप म्हणाला की, ‘फिटनेस प्रशिक्षक एड्रियन यांनी माझ्या फिटनेसवर खूप काम केले आहे आणि सर्व काही खूप चांगले सुरू आहे. संघाच्या रणनितीनुसार मी फक्त योग्य लेन्थवर चेंडू फेकण्याचा प्रयत्न करत होतो, ज्यात मला यश आले.’