

Ind-Pak cricket match : आशिया चषक स्पर्धेतील रविवार, १४ सप्टेंबर रोजी होणारा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर (PIL) तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज (दि. ११) नकार दिला. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळणे हे राष्ट्रीय हिताच्या विरोधात असल्याचे संबंधित याचिकेत नमूद कण्यात आले होते.
"जेव्हा आपले सैनिक आपल्या प्राणांची आहुती देत आहेत, तेव्हा त्याच दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशासोबत आपण खेळाचा आनंद साजरा करत आहोत, असा चुकीचा संदेश पाकिस्तानसोबत खेळल्याने जातो. यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांमुळे जीव गमावलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. मनोरंजनापेक्षा देशाची प्रतिष्ठा आणि नागरिकांची सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे. क्रिकेटला राष्ट्रीय हितापेक्षा, नागरिकांच्या जीवापेक्षा किंवा सैनिकांच्या बलिदानापेक्षा मोठे मानले जाऊ शकत नाही" असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) प्रतिवादी म्हणून जोडण्यात आले असून, बीसीसीआयला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीत आणावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याचिकेवर न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांच्या खंडपीठासमोर सुनाणवी झाली. या प्रकरणी सुनावणीची एवढी काय गडबड आहे. हा एक सामना आहे, तो होऊ द्या," असे न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी स्पष्ट केले. याचिकेवर उद्या सुनावणी न झाल्यास ती निरर्थक ठरेल, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायमूर्ती म्हणाले, "सामना या रविवारी आहे? त्यात आम्ही काय करू शकतो? तो होऊ द्या. सामना सुरू राहिला पाहिजे."
संबंधित याचिका ही कायद्याचे विद्यार्थी असणार्या चौघांनी दाखल केली होती. याचिका चांगली असो वा वाईट, किमान त्यावर सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती वकिलांनी केली. मात्र, न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी ती विनंती फेटाळून लावली. "दररोज एकीकडचा सामना, दुसरीकडचा सामना... एक चेंडू..." अशा शब्दांमध्ये न्यायमूर्तींनी सामना सुरू राहिला पाहिजे, असे स्पष्ट केले.