

Kevin Pietersen IPL XI
नवी दिल्ली: इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज केविन पीटरसनने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 'आयपीएल इलेव्हन' जाहीर केला आहे. मात्र, ही टीम निवडताना त्याने अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. मुंबई इंडियन्सला पाचवेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला पीटरसनने आपल्या संघात स्थान दिलेले नाही, तसेच स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यालाही त्याने डच्चू दिला आहे.
'फॉर द लव्ह ऑफ क्रिकेट' या कार्यक्रमात जोस बटलरसोबत चर्चा करताना पीटरसनने आपला संघ निवडला. यावेळी त्याने युझवेंद्र चहलचा संघात समावेश केला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चहलला संघातून मुक्त करणे हा आयपीएल इतिहासातील 'सर्वात वाईट निर्णय' असल्याचे पीटरसनने पुन्हा एकदा सांगितले.
केविन पीटरसनने आपल्या 'सर्वकालीन IPL Playing XI' (संघा) मध्ये विराट कोहली आणि एम.एस. धोनीचा समावेश केला आहे. पीटरसनने विराट कोहलीला संघात सलामीवीर म्हणून स्थान दिले आहे, तर एम.एस. धोनीची कर्णधार म्हणून निवड केली आहे.
पीटरसनच्या मते, महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या संघातील एकमेव असा खेळाडू आहे ज्याच्या नावावर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. त्याने धोनीलाच संघाचा कर्णधार आणि यष्टिरक्षक म्हणून निवडले आहे. विशेष म्हणजे, आपला संघ अंतिम करताना पीटरसन आयपीएलचा एक महत्त्वाचा नियम विसरला. नियमानुसार संघात केवळ ४ परदेशी खेळाडू असावे लागतात, मात्र पीटरसनच्या संघात परदेशी खेळाडूंचा भरणा अधिक आहे.
ख्रिस गेल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), आंद्रे रसेल, रवींद्र जडेजा, सुनील नरेन, युझवेंद्र चहल, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह.
IPL मध्ये, संघांना त्यांच्या Playing XI मध्ये केवळ चार परदेशी खेळाडूंनाच मैदानात उतरवण्याची परवानगी असते. तथापि, केविन पीटरसनने या नियमाचे पालन केले नाही आणि पाच परदेशी खेळाडूंची निवड केली. त्याने ख्रिस गेल, ए.बी. डिव्हिलियर्स, सुनील नरेन, आंद्रे रसेल आणि लसिथ मलिंगा यांची निवड केली.
केविन पीटरसनने २००९ ते २०१६ या कालावधीत IPL मध्ये सहभाग घेतला. त्याने ३६ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना १३४.७ च्या स्ट्राईक रेटने १,००१ धावा केल्या. त्याच्या IPL कारकिर्दीत एका शतकाचा आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.