

delhi capitals vs punjab kings PL 2026
नवी दिल्ली : आयपीएल २०२६ मध्ये शनिवारी पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर दिल्लीचा खेळाडू करुण नायर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, परंतु यावेळी चर्चेचे कारण त्याचे अपयश ठरले आहे.
करुण नायरने दिलेले दोन जीवदान दिल्लीला महागात पडले. पहिली चूक १५ व्या षटकात विप्रज निगमच्या चेंडूवर झाली, जेव्हा लाँग-ऑफला आलेला सोपा झेल नायरच्या हातातून निसटला. त्यानंतर अवघ्या चार चेंडूंनंतर कुलदीप यादवच्या 'रॉन्ग वन'वर त्याने पुन्हा एकदा श्रेयस अय्यरचा झेल सोडला आणि त्याला दुसरे जीवदान दिले.
नायरने सोडलेल्या झेलचा फायदा घेत श्रेयस अय्यरने ७१ धावांची तुफानी खेळी करत पंजाब किंग्सला आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या धावांचा यशस्वी पाठलागाकडे नेले. पंजाबने हे लक्ष्य ७ चेंडू राखून पूर्ण केले. त्यापूर्वी प्रभसिमरन सिंग (७६ धावा) आणि प्रियांश आर्या (४३ धावा) यांनी १२६ धावांची धडाकेबाज सलामी देत विजयाचा पाया रचला होता.
मैदानावर झेल सुटल्यानंतर करुण नायर प्रचंड निराश दिसला. तो जुना कठीण काळ आणि सोशल मीडिया पोस्टबद्दल अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना नायर म्हणाला होता की, "ती पोस्ट पाहून माझी पत्नी मला विचारत होती की तू हे काय करतोयस? पण मी तिला सांगितले की, मला त्यावेळी तसेच वाटत होते. तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. त्यावेळी माझे जग संपले आहे असे मला वाटले होते."
पंजाबने दिल्लीत २६५ धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग यशस्वीपणे पूर्ण केला. या सामन्यात करुण नायरसाठी मैदानावरचा काळ अत्यंत कठीण होता. त्याचे दोन झेल सुटल्यानंतर सोशल मीडियावर त्याची एक जुनी भावनिक पोस्ट पुन्हा व्हायरल होऊ लागली आहे, ज्यात त्याने म्हटले होते, "डिअर क्रिकेट, मला आणखी एक संधी दे." आता पुन्हा एकदा मोक्याच्या क्षणी झेल सुटल्याने नायरची jहीच जुनी पोस्ट आणि त्याचा संघर्षमय प्रवास क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. तर काही जण या पोस्टचा आधार घेत त्याला ट्रोल करत आहेत.