

IPL 2026 Star Player And Team Standing : आयपीएल २०२६ च्या हंगामात जे खेळाडू धडाकेबाज खेळी करून आपल्या संघाला हंगामाची वादळी सुरूवात करून देतील अशी अपेक्षा होती त्याच खेळाडूंचा सध्या दुष्काळात तेरावा महिना सुरू असल्यानं त्यांचे संघ सध्या रसातळाला पोहचले आहेत. यात चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, कोलकाता नाईट रायडर्सचा रिंकू सिंह फिन अॅलन यांचा समावेश आहे.
आयपीएलच्या लीग स्टेजचे अर्धे सामने झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला चांगल्या स्थिती पोहचवेल अशी आशा होती. मात्र त्याला अजूनही सूर गवसलेला नाहीत. तसेच कर्णधारपदाबाबत बोलायचं झालं तर तो अजून धोनीच्या छत्रछायेतून बाहेर आलेला नाही.
फलंदाजीत तो संघाचा दीपस्तंभ राहिलेला आहे. त्याने गेल्या अनेक हंगामात ५०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मात्र या हंगामात त्याला लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात यश आलेलं नाही. बहुदा त्याच्यावर कर्णधारपदाचा दबाव असेल किंवा त्याला सततच्या दुखापतींमुळे अजून लय सापडलेली नसेल. आता सीएसकेचे संघव्यवस्थापन हंगामाच्या पुढच्या टप्प्यात ऋतुराज आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतेल अशी आशा ठेवून आहे.
चेन्नईने हैरदाबादचा सामना थोडक्यात गमावला. १९४ धावांचे आव्हान पार करताना चांगली सुरूवात करून देखील चेन्नईने सामना १० धावांनी गमावला. दहाव्या षटकानंतर मंदावलेली फलंदाजी हे या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं.
ऋतुराजने सहा सामन्यात १३.६७ च्या सरासरीने ८२ धावा केल्या आहेत. ऋतुराजने आता सलामीला येण्याऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यावं अशी मागणी सुरू झाली. त्यातच आयुष म्हात्रेला दुखापत झाल्यामुळं हा मुद्दा देखील आता मागे पडण्याची शक्यता आहे. सीएसके सध्या सातव्या क्रमांकावर आहे.
दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स देखील सध्या गुणतालिकेत खालीच आहे. इथं देखील सलामीवीर फिन अॅलन आणि फिनिशर रिंकू सिंह यांची सुमार कामगिरी चर्चेचा विषय ठरली आहे. केकेआरने न्यूझीलंडच्या फिनला तो सामना जिंकून देईल या अपेक्षेने मोठी रक्कम मोजून आपल्या संघात घेतलं. मात्र त्याने पाच सामन्यात फक्त ८१ धावा केल्यानंतर केकेआरला त्याला प्लेईंग ११ मधून वगळावं लागलं.
दुसरीकडं मॅच फिनिशर रिंकू सिंह देखील अपयशी ठरत आहे. त्याने आतापर्यंत १९.७५ च्या सरासरीने फक्त ७९ धावा केल्या आहेत. अखेर सहाव्या सामन्यात केकेआरच्या रिंकूची बॅट तळपली. त्याने राजस्थान रॉयल्स विरूद्ध नाबाद अर्धशतकी खेळी केली. मात्र संघाची बांधणी ज्या फलंदाजांच्या भोवती झाली आहे तेच जर सुमार कामगिरी करू लागले तर त्याचा परिणाम अख्ख्या संघाला भोगावा लागतो.
असाच काहीसा प्रकार मुंबई इंडियन्सबाबतही झाला आहे. जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे मुंबईचे दोन चॅम्पियन्स खेळाडू संघाची शान आहेत. मात्र यंदाच्या हंगामात त्यांच्या कामगिरीला नजर लागली अन् मुंबई इंडियन्स गुणतालिकेत ९ व्या स्थानावर घसरली आहे. आतापर्यंत मुंबईने पाच सामने खेळले आहेत. बुमराहला एकही विकेट घेता आलेली नाही. तर गेल्या हंगामात ७०० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या सूर्याने गेल्या पाच सामन्यात फक्त १०६ धावा केल्या आहेत. त्याची आतापर्यंतची सर्वात चांगली खेळी म्हणजे दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध केलेल्या ५१ धावा....
२०१६ पासून बुमराहने प्रत्येक हंगामात १५ पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. यंदाच्या हंगामात मात्र त्याची पाटी अजून कोरी आहे. त्याचा फटका त्याच्या संघाला बसला आहे.
लखनौला यंदाच्या हंगामात आतापर्यंत फक्त दोन सामनेच जिंकता आले आहेत. ते सध्या आठव्या स्थानावर आहेत. लखनौला मार्करमकडून मोठ्या अपेक्षा आहेत. टी २० वर्ल्डकमध्ये त्याने चांगला फॉर्म दाखवला होता. मात्र आयपीएलमध्ये गेल्या सहा सामन्यात त्याने १६२ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी २७ इतकी आहे.
दुसरीकडं निकोलस पूरननेही मोठी निराशा केली आहे. गेल्या हंगामात त्याने ५२४ धावा केल्या होत्या. मात्र यंदाच्या हंगामात पाच सामन्यात त्याने फक्त ४२ धावा केल्या आहेत.
अजून हंगामात बरेच सामने शिल्लक आहेत. त्यामुळं हे दिग्गज बाऊन्स बॅक करून आपल्या संघाला विजयी मार्गावर परत आणतात का हे पहावं लागेल.