

चेन्नई : न्यूझीलंड पाठोपाठ द. आफ्रिकेविरुद्ध भारतीय क्रिकेट संघाने कसोटी मालिका गमावल्या. घरच्या मैदानावर भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. पाहुण्या न्यूझीलंडने भारताला तीन कसोटीत मात दिली तर द. आफ्रिकेने दोन्ही कसोटी जिंकल्या. या मालिकेत भारतीय संघातील टॉपच्या फलंदाजांनी पाहुण्या संघांच्या फिरकी गोलंदाजांपुढे नांगी टाकली.
दरम्यान, 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार, महान अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांनी भारतीय संघाच्या पराभवावर भाष्य करताना कारणेही सांगितली आहेत. टीम इंडियातील टॉपच्या फलंदाजांनी देशांतर्गत क्रिकेटकडे केलेले दुर्लक्ष आणि खेळपट्ट्यांची योग्य तयारी नसल्याने संघाला पराभवाला सामोरे जावे लागले, असे कपिल देव यांनी म्हटले आहे.
फिरकी गोलंदाजीविरुद्ध अपयशाची कारणे सांगताना कपिल देव म्हणाले, मी फक्त हे जाणून घेऊ इच्छितो की, आजचे किती टॉप खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत आहेत. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही देशांतर्गत क्रिकेट खेळला नाहीत आणि दर्जेदार गोलंदाजांना सामोरे गेला नाहीत, तर तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. सुनील गावसकर, गुंडाप्पा विश्वनाथ आणि दिलीप वेंगसरकर यांसारखे दिग्गज फलंदाज विविध प्रकारच्या खेळपट्ट्यांवर भरपूर देशांतर्गत क्रिकेट खेळल्यामुळे फिरकीचा सामना चांगल्या प्रकारे करू शकत होते.
भारतीय खेळपट्ट्यांच्या तयारीवर कपिल देव यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ज्या खेळपट्ट्यांवर खेळ दोन किंवा अडीच दिवसांत संपतो, त्यांचा काय उपयोग? ज्या खेळपट्ट्यांवर कोणताही संघ 200 धावा ओलांडत नाही, त्या 5 दिवसांच्या खेळासाठी चांगल्या नाहीत. अशा फिरकी किंवा सीम-सहाय्यक पृष्ठभागांवर खेळण्यासाठी फलंदाजांना संयम आणि वेगळ्या कौशल्याची आवश्यकता असते.
कपिल देव म्हणाले, आजकाल टी-20 आणि वन डे क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित केले जात असल्याने फलंदाज गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांवर कमी खेळतात. राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे फलंदाज विकेटवर थांबण्याचे महत्त्व जाणत होते. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी म्हणजे फक्त मध्यभागी टिकून राहणे होय. फिरकीचा सामना करण्यासाठी वेगवान गोलंदाजी खेळण्यापेक्षा अधिक चांगल्या कौशल्याची गरज असते आणि यात फुटवर्क महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.