

सिडनी : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज जोश इंगलिस या मालिकेतून बाहेर झाला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात १ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाच्या संघाला एक मोठा झटका बसला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला पर्थमध्ये धावण्याच्या सत्रानंतर इंग्लिसला त्याच्या उजव्या पोटरीत त्रास जाणवला होता. स्कॅन केल्यानंतर त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्या जागी आता टी-२० मालिकेसाठी ॲलेक्स कॅरीचा संघात समावेश केला आहे.
टी-२० मालिकेतून बाहेर झाल्यानंतर इएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत जोश इंग्लिसने सांगितले की, ‘जायबंदी होण्यावर आमचं नियंत्रण नाही. गेल्या काही वर्षांपासून हे सुरू आहे. माझ्यासाठी हे खूप निराशाजनक आहे. ही अशी गोष्ट आहे, जी मला सतत खेळापासून दूर ठेवत आहे.’ इंग्लिस पुढे म्हणाला, ‘दुखापत ही अशी गोष्ट आहे, जी मला सांभाळावी लागेल. त्यामुळे सध्या मला हवी तेवढी फलंदाजी करता येत नाहीये.’
जोश इंग्लिसने ऑस्ट्रेलियासाठी ३६ टी-२० सामन्यांमध्ये ३०.२७ च्या सरासरीने ८७८ धावा केल्या आहेत. तसेच, ३३ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने २९.४६ च्या सरासरीने ७६६ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त, ३ कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून ११९ धावा आल्या आहेत. जोश इंग्लिस भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. भारताविरुद्धच्या मालिकेला १९ ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये सुरुवात होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तर, अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनला ॲशेसपूर्वी शेफील्ड शिल्ड क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज नाथन एलिस वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेतून बाहेर झाला आहे.
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅविस हेड, ॲलेक्स कॅरी, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, सीन ॲबॉट, बेन ड्वारशुइस, झेवियर बार्टलेट, ॲडम झाम्पा, जोश हेझलवुड, मॅट कुहनेमन.