

दुबई : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर सुरू झालेल्या वादानंतर, पाकिस्तानने यूएईविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सुमारे 140 कोटी रुपयांच्या संभाव्य आर्थिक नुकसानीमुळे हा निर्णय बदलल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितल्यानंतर संघ खेळण्यासाठी तयार झाला, असा दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ने केला आहे. मात्र या दाव्याला आयसीसीकडून पुष्टी मिळालेली नाही.
14 सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. यावर पीसीबीने तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्टवर खेळ भावनेविरोधात वर्तन केल्याचा आरोप करत त्यांना स्पर्धेतून काढून टाकण्याची मागणी केली, जी आयसीसीने फेटाळली.
या प्रकरणामुळे पाकिस्तान संघ स्पर्धेतून माघार घेणार असल्याचा अंदाज होता. जर पाकिस्तानने माघार घेतली असती तर त्यांना मोठा आर्थिक फटका बसला असता. आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) वार्षिक उत्पन्नापैकी 15 टक्के हिस्सा पाकिस्तानला मिळतो. यात प्रसारण हक्क, प्रायोजकत्व आणि तिकीट विक्रीतून मिळणार्या उत्पन्नाचा समावेश असतो. केवळ या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमधून पीसीबीला अंदाजे 12 ते 16 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (जवळपास 140 कोटी) मिळण्याची अपेक्षा होती. या मोठ्या नुकसानीमुळे पाकिस्तानने अखेर आपला निर्णय बदलला.
पायक्रॉफ्टने माफी मागावी आणि भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला दंड ठोठावा, अशा दोन अटी यूएईविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानने ठेवल्या होत्या. आयसीसीने या दोन्ही अटी फेटाळल्या. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पायक्रॉफ्टने माफी मागितल्याचा दावा केला असला तरी, आयसीसी किंवा पायक्रॉफ्टकडून कोणतेही अधिकृत निवेदन आले नाही. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पायक्रॉफ्टने कोणतीही माफी मागितलेली नाही, फक्त गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी बैठक घेतली होती.