

Jasprit Bumrah POTM Nominations: टी २० वर्ल्डकप २०२६ च्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात भारताने बलाढ्य इंग्लंडचा अवघ्या ७ धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २५३ धावा केल्या होत्या. मात्र इंग्लंडला २० षटकात ७ बाद २४६ धावांपर्यंच मजल मारता आली. भारताच्या या विजयात जसे संजू सॅमसनचे मोठे योगदान होतं तसंच ते गोलंदाज जसप्रीत बुमराहचं देखील होतं. त्यानं ४ षटकात अवघ्या ३३ धावा देत १ विकेट मिळवली. टी २० वर्ल्डकपमध्ये भारताच्या अनेक विजयात बुमराहच्या गोलंदाजीचा मोठा वाटा होता. मात्र असं असलं तरी आयसीसीने नुकतेच टी २० वर्ल्डकप २०२६ च्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या नामांकनांची घोषणा केली. या आठ नामांकनात भारताच्या जसप्रीत बुमराहचा समावेश करण्यात आलेला नाही.
दुसऱ्या सेमी फायलन सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या दोन खेळाडूंचा आयसीसीने जाहीर केलेल्या POTM च्या नामांकनात समावेश आहे. यात विल जॅक्स हा आघाडीवर असून त्याने स्पर्धेत चांगली अष्टपैलू कामगिरी केली आहे. इंग्लंडने या स्पर्धेत त्यांच्या लौकिकास साजेसा खेळ केला नाही. मात्र तरी देखील ते सेमी फायनलमध्ये पोहचले. यात विल जॅक्स याचे योगदान मोठं आहे.
त्याने फिनिशरची भूमिका योग्य प्रकारे निभावली. त्याने १७६.५६ च्या स्ट्राईक रेटने २२६ धावा केल्या असून गोलंदाजीत ९ विकेट्स घेऊन संघासाठी मोठी कामगिरी केली. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात त्यानं २२ धावात ३ तर न्यूझीलंडविरूद्ध २३ धावात २ विकेट्स घेतल्या होत्या.
भारताच्या संजू सॅमसनला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचे नामांकन मिळालं आहे. स्पर्धेला सुरूवात झाली त्यावेळी संजू सॅमसन हा प्लेईंग ११ मध्ये नव्हता. मात्र अभेषक शर्माची खराब कामगिरी त्याच्या पथ्यावर पडली. त्याला संघात संधी मिळाली अन् त्याची कारकीर्दच बदलून गेली.
संजू सॅमसन हा स्पर्धेपूर्वी फॉर्ममध्ये नव्हता. मात्र संजूला संधी मिळाली अन् त्याने वेस्ट इंडीज विरूद्धच्या सामन्यात ९७ धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर त्याने सेमी फायनल सारख्या नॉक आऊट सामन्यात ४२ चेंडूत ८९ धावा ठोकल्या. त्याने फक्त ४ सामन्यात २३२ धावा केल्या आहेत. त्याचे स्ट्राईक रेट २०१.७ इतकं आहे.
आयसीसीने प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ८ खेळाडूंना नामांकन दिलं आहे. टी २० वर्ल्डकपमधील संघांकडून चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा यात समावेश आहे. मात्र आयसीसीने जसप्रीत बुमराहच्या नावाचा विचार केला नाही. बुमराहनं सेमी फायनल सामन्यात ३३ धावात १ विकेट घेतली. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर बुमराहनं इंग्लंडच्या फलंदाजांना थोपवून धरलं होतं. त्याची या सामन्यातील इकॉनॉमी ८.२० इतकी होती.
बुमराहसारखी कोणत्याही खेळाडूची इकॉनाॉमी नाहीये. बुमराहने यंदाच्या टी २० वर्ल्डकपमध्ये आपली ६.६२ इतकी किफायतशीर इकॉनॉमी ठेवली आहे. इतकी चांगली इकॉनॉमी कोणत्याही इतर गोलंदाजाची नाही. त्याने ७ सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाजीतील त्याची सरासरी १५.९० इतकी असूनही आयसीसीने POTM साठी च्याचा विचार केलेला नाही.