

T20 World cup 2026 ind vs pak ishan kishan Warning to usman tariq
नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्यापूर्वी भारतीय संघाने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. पाकिस्तानचा ‘पॉज’ फिरकीपटू उस्मान तारिक याचे आव्हान परतवून लावण्यासाठी भारतीय फलंदाज सज्ज असल्याचे यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने सांगितले आहे. नामिबियाविरुद्ध दिमाखदार विजय मिळवल्यानंतर बोलताना इशानने स्पष्ट केले की, उस्मान तारिकच्या 'साईडआर्म' ॲक्शनचा सामना करण्यासाठी संघाने आधीच पुरेसा सराव केला आहे.
अपेक्षेप्रमाणे, टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान या साखळी सामन्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. उभय संघांमधील सामना हा नेहमीच क्रिकेट विश्वातील सर्वाधिक पसंतीचा सामना असतो. त्यातच मैदानाबाहेरील अनेक नाट्यमय घडामोडींनंतर हे दोन्ही संघ आमनेसामने येत आहेत. दोन्ही संघांनी आपापले पहिले सामने जिंकल्यामुळे, बाद फेरीतील स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरेल.
नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मस याची गोलंदाजी करण्याची शैली उस्मान तारिकशी मिळतीजुळती आहे. इशानच्या मते, इरास्मसच्या गोलंदाजीचा सामना केल्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय फलंदाजांची चांगली तालीम झाली आहे. इशानने या सामन्यात अवघ्या २४ चेंडूंत ६१ धावांची स्फोटक खेळी केली. ज्यामुळे भारताला २०९ धावांपर्यंत मकल मारण्यात यश आले.
पत्रकारांशी बोलताना इशान म्हणाला, ‘‘आम्ही आमची तयारी पूर्ण केली आहे. आता फक्त चेंडूवर लक्ष केंद्रित करून आपला नैसर्गिक खेळ खेळण्याची वेळ आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही व्हिडिओ विश्लेषणाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या शैलीचा अभ्यास करतो. त्यामुळे आम्ही गोष्टी सोप्या ठेवण्यावर भर देत आहोत.’’
झारखंडला सय्यद मुश्ताक अली करंडक जिंकवून दिल्यानंतर आपल्या स्वभावात आणि खेळात झालेल्या बदलावरही इशानने भाष्य केले. तो म्हणाला, ‘‘मी आता पूर्वीसारखा राहिलो नाही. पूर्वी मी २४ तास थट्टा-मस्करी करायचो, पण आता मी खेळाबाबत अधिक गंभीर झालो आहे. आता दिवसातील केवळ दोन-तीन तास मी मजेत घालवतो, उर्वरित वेळ केवळ फलंदाजी आणि यष्टीरक्षणावर लक्ष केंद्रित करतो.’’
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या महत्त्वाबाबत बोलताना इशानने सांगितले की, हा सामना सर्वांसाठीच खास असतो. मात्र, अतिविचार करण्याऐवजी प्रत्यक्ष मैदानावरील परिस्थिती आणि खेळपट्टीचे स्वरूप पाहूनच अंतिम रणनीती ठरवली जाईल. हार्दिक पंड्याचे अर्धशतक आणि फिरकीपटूंनी नामिबियाच्या डावाला लावलेला लगाम यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास सध्या दुणावलेला आहे.