

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पुढील हंगामापासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे सामने स्टेडियममधून पाहणे अधिक महाग होणार आहे. बुधवारी जाहीर झालेल्या नव्या जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) सुधारणांनुसार, आता आयपीएल तिकिटांवर 40 टक्के कर लागणार आहे. याआधी हा कर 28 टक्के होता. त्यामुळे, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर(आरसीबी) च्या घरच्या सामन्याचे सर्वात महागडे तिकीट (आधी 42,350 रुपये) आता जवळपास 4,000 रुपयांनी वाढून 46,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्याचप्रमाणे, चेपॉक स्टेडियमवरील सर्वात महागडे तिकीट (7,000 रुपये) आता 7,656 रुपये होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत, तिकिटाच्या मूळ किमतीवर 28 टक्के कर लागत होता. उदाहरणार्थ, चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) च्या घरच्या सामन्यासाठी एमए चिदंबरम स्टेडियममधील सर्वात स्वस्त तिकीट 1,700 रुपयांना मिळायचे, जे आता कर वाढल्यानंतर किमान 1,860 रुपये होईल. त्याचप्रमाणे, 2,500 रुपयांचे तिकीट आता 2,754 रुपयांना मिळेल. चेन्नईमधील चाहत्यांना याव्यतिरिक्त राज्य सरकारला 25 टक्के मनोरंजन करही द्यावा लागेल.
गेल्या वर्षी ‘सर्ज प्राईसिंग’ मॉडेलचा वापर करणार्या गतविजेत्या आरसीबीच्या घरच्या सामन्यांसाठी सर्वात स्वस्त तिकीट (2,300 रुपये) आता सुमारे 2,515 रुपयांना मिळेल.
या नव्या सुधारणेनुसार, केवळ आयपीएलच नाही, तर प्रो-कबड्डी लीग आणि इंडियन सुपर लीगची तिकिटेही महागणार आहेत. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) च्या प्रसिद्धीपत्रकानुसार, 500 रुपयांपर्यंतच्या तिकिटांवर कोणताही कर लागणार नाही. मात्र, 500 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तिकिटांवर 18 टक्के कर कायम राहील.