
Delhi crime news
दिल्ली : दिल्लीच्या दक्षिणपुरी परिसरात शनिवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका घरात एकाचवेळी तीन मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हे तीनही मृतदेह एका बंद खोलीत आढळून आले असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये तीन पुरुषांचा समावेश आहे, ज्यामध्ये दोन सख्खे भाऊ आहेत. सर्वजण एसी मेकॅनिकचे काम करत होते. खूप वेळ दरवाजा उघडला नसल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला असता, खोलीत सर्वांचे मृतदेह सापडले. प्राथमिक तपासात श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित खोलीत कुठलाही वेंटिलेशनचा मार्ग नव्हता आणि दरवाजा पूर्णपणे बंद होता. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आजूबाजूच्या लोकांची चौकशी सुरू आहे. घटनास्थळी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. फॉरेंसिक पथकालाही घटनास्थळी बोलावण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितलं की, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. रिपोर्ट आल्यानंतरच कारण स्पष्ट होईल.