

बेळगाव ः बंगळूरला होणार्या आयपीएल क्रिकेट तिकीट विक्रीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी मंगळवारी (दि. 22) पत्रकार परिषदेत केला. सर्वसामान्यांना तिकीट न मिळता धनदांडग्यांना काळ्याबाजारात विक्री केल्याचा त्यांचा आरोप आहे.
आमदार पाटील यांनी जिल्ह्यातील 20 कुटुंबांना आयपीएल क्रिकेट मॅच दाखविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी 20 व्हीआयपी पासेसची मागणी कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनकडे मागितली होती. तसे पत्र त्यांनी सभापती सचिवांमार्फत क्रिकेट असोसिएशनला दिले आहे. 3 मे रोजी बंगळूरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात क्रिकेट सामना होणार आहे.
या सामन्यासाठी एका तिकीटाची किंमत चार हजार रुपये आहे. या सामन्याचा आनंद जिल्ह्यातील काहींना घेता यावा, यासाठी त्यांनी 20 व्हीआयपी तिकीटांची मागणी केली होती. परंतु, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनने तिकीटे संपली असल्याचे सांगत तिकीटे देण्यास नकार दिला. ऑनलाईन तिकीटे किती विकली. थेट किती तिकिटांची विक्री झाली, याची काहीही माहिती असोसिएशनकडून उघड केली जात नाही. याचा अर्थ तिकीट विक्रीत गैरव्यवहार झाल्याचा त्यांचा आरोप आहे.
जी ऑनलाईन व ऑफलाईन तिकीट विक्री केली जाते त्यामध्ये पारदर्शीपणा नाही. कुणाला तिकीट विक्री केली आहे, याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे मागितली आहे. यासंदर्भात त्यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून याची चौकशी करण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले.