

IPL 2026
मुंबई: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील 'पंजाब किंग्स' संघाला गुरुवार IPL २०२६ मधील त्यांच्या सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. आपल्या पहिल्या सात सामन्यांपैकी सहा सामने जिंकलेल्या पंजाबचा विजयरथ अचानक रूतला असून नेमके काय बिघडले हे अजूनही एक कोडेच बनून राहिले आहे. सातपैकी सहा सामने जिंकल्यानंतर, प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित करणारा पंजाब हा पहिला संघ ठरेल, असे वाटू लागले होते. मात्र, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे; यात कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते. एके काळी पंजाब संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ असेल, असे भाकीत वर्तवले जात असताना; आता मात्र त्यांच्यावर स्पर्धेतूनच बाहेर पडण्याचे गंभीर संकट ओढवले आहे.
सध्याच्या गुणतालिकेनुसार, पंजाब किंग्स १२ सामन्यांनंतर १३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. यामध्ये ६ विजय, ५ पराभव आणि केकेआर विरुद्धचा एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने मिळालेल्या एका गुणाचा समावेश आहे. पंजाबचे आता केवळ दोन सामने शिल्लक आहेत. जर त्यांनी हे दोन्ही सामने जिंकले, तरी ते जास्तीत जास्त १७ गुणांपर्यंत मजल मारू शकतात. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांकडे प्रत्येकी १८ गुण मिळवण्याची संधी अजूनही कायम आहे. आज होणाऱ्या लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला, तर ते १४ गुणांसह पंजाबला पहिल्या चारमधून थेट बाहेर ढकलतील.
पंजाब किंग्सला बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी आता केवळ स्वतःच्या कामगिरीवर अवलंबून राहून चालणार नाही, तर इतर संघांच्या निकालावरही लक्ष ठेवावे लागेल. पंजाबचे पुढील सामने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (१७ मे) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (२३ मे) यांच्याशी आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पंजाबला हे दोन्ही सामने जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. एकही पराभव झाल्यास त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. पंजाबने दोन्ही सामने जिंकून १७ गुण मिळवले तरी, त्यांना चेन्नई किंवा राजस्थान यांपैकी एका संघाने किमान एक सामना हरावा लागेल अशी अपेक्षा करावी लागेल.
चेन्नई आणि राजस्थानचे प्रत्येकी ३ सामने शिल्लक असून दोघांकडे १२ गुण आहेत. जर या दोन्ही संघांनी त्यांचे सर्व सामने जिंकले, तर ते १८ गुणांसह पात्र ठरतील आणि पंजाबचे १७ गुण असूनही त्यांचे पान कापले जाईल. मात्र, या दोन पैकी एका संघाने जरी एक सामना गमावला, तर ते १६ गुणांवर अडकतील आणि पंजाबला १७ गुणांसह प्लेऑफचे तिकीट मिळू शकेल. सलग पाच पराभवांमुळे पंजाबच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण आहे.