

IPL 2026 kkr Vs gt Varun Chakravarthy: इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे. केकेआरकडून खेळणाऱ्या वरूण चक्रवर्तीबाबत संघ व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयामुळे संघाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार वरूण चक्रवर्तीच्या उजव्या पायाला एक हेअरलाईन फ्रॅक्चर होते. तरी देखील वरूण चक्रवर्तीला गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात खेळवण्यात आले. केकेआरने बीसीसीआयच्या नियमावलीला केराची टोपली दाखवली असल्याचे बोलले जात आहे.
सामन्यावेळी वरूण चक्रवर्ती हा दुखापतीमुळं अस्वस्थ असल्याचं दिसत होतं. गोलंदाजी करताना तो लंगडत चेंडू टाकत होता. त्याला आपला स्पेल देखील पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर या प्रकरणाबाबत जोरदार चर्चा होऊ लागली आहे. अनेकांनी केकेआरच्या संघ व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संघ व्यवस्थापनाने खेळाडूच्या फिटनेसबाबत मोठी जोखिम उचलली होती.
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी देखील मत व्यक्त केलं आहे. सैकिया यांनी स्पष्ट केलं की आयपीएलवेळी खेळाडूंच्या दुखापती आणि फिटनेसची जबाबदारी फ्रेंचायजीची असते. मात्र सैकिया यांनी बीसीसीआय आणि बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलेन्स देखील खेळाडूंच्या फिटनेस आणि वर्कलोडवर नजर ठेवून असते असं सांगितलं.
सैकिया यांनी सांगितलं की, 'आयपीएलवेळी फ्रेंचायजी खेळाडूंच्या दुखापती आणि फिटनेसबाबत काळजी घेते. COE चे फिजिओ देखील खेळाडूंच्या फिटनेस आणि वर्कलोड मॅनेजमेंट मॉनिटर करत असते. मात्र स्पर्धेवेळी आम्ही फार दखल देत नाही. जर हा विषय भारतीय संघाचा असता तर त्याच्यावर आमचे जास्त नियंत्रण असते.
बीसीसीआय प्रोटोकॉलनुसार आयपीएल फ्रेंचायजीच्या फिजिओंना भारतीय टीमच्या मेडिकल स्टाफसोबत कायम संपर्कात रहावं लागतं. जर कोणत्या खेळाडूची दुखापत गंभीर होण्याचा धोका असेल तर बोर्ड फ्रेंचायजीला सतर्क देखील करत असते. मात्र असं असलं तरी स्पर्धेदरम्यान खेळाडूच्या दुखापतीबाबत शेवटचा निर्णय घेण्याचा अधिकार हा फ्रेंचायजीला आणि त्यांच्या मेडिकल टीमला आहे असं मानलं जातं.
वरूण चक्रवर्ती हा भारताच्या केंद्रीय करारात सामील असलेला खेळाडू आहे. त्यामुळं त्याच्या दुखापतीमुळं चिंता अजूनच वाढली आहे. याबाबत क्रिकेट चाहते आणि काही माजी खेळाडूंनी प्रश्न उपस्थित केले आहेत. जर खेळाडू पूर्णपणे फिट नसेल तर त्याला मैदानावर का उतरवलं गेलं असा प्रश्न ते विचारत आहेत.
या प्रकरणानंतर केकेआर संघव्यवस्थापनाबाबत आणि कोचिंग स्टाफबाबत देखील प्रश्न चिन्ह उपस्थित झालं आहे. त्यांच्या भूमिकेवर टीका होत आहे.
आता हा वाद वरूण चक्रवर्तीच्या दुखापतीपुरता मर्यादित राहिला नाही. आयपीएलमध्ये खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंट आणि सुरक्षेबाबत देखील मोठी चर्चा उपस्थित झाली आहे. आता या प्रकरणाबाबत बीसीसीआय आणि केकेआरकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.