

IPL 2026 Final
अहमदाबाद : आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज (दि. ३१) काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. या सामन्यात गतविजेत्या बेंगळुरूकडे इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. दरम्यान, फायनलच्या या महामुकाबल्यासाठी 'रिझर्व्ह डे' (राखीव दिवस) देखील ठेवण्यात आला आहे.
आयपीएल २०२६ मधील दोन महिन्यांपेक्षा जास्त काळाच्या थरारानंतर आता अंतिम फेरीची वेळ आली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे दोन संघ आमनेसामने असतील. या सामन्यात हवामान पूर्णपणे पूरक असेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. मात्र, जर पावसाने अचानक व्यत्यय आणला आणि काही कारणास्तव आज सामना होऊ शकला नाही, तर 'रिझर्व्ह डे'चा पर्यायही उपलब्ध आहे.
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीसाठी अहमदाबादमध्ये गुजरातला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करणे हे मोठे आव्हान असेल. तर दुसरीकडे, या हंगामात आरसीबीला दुसऱ्यांदा हरवण्याचे आव्हान गुजरातसमोर असेल. या हंगामातील लीग स्टेजच्या पहिल्या सामन्यात आरसीबीने गुजरातला मात दिली होती. त्यानंतर अहमदाबादमध्ये आपल्या घरच्या मैदानावर गुजरातने विजय मिळवला होता. पुढे क्वालिफायर १ मध्येही आरसीबीने गुजरातचा पराभव केला. म्हणजेच या हंगामात गुजरातचा संघ एकाच संघाविरुद्ध चौथ्यांदा भिडणार असून क्वालिफायर १ मधील पराभवाची परतफेड करण्यांकडे लक्ष असेल.
अहमदाबादमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याचा अंदाज आहे. आकाश पूर्णपणे निरभ्र असून पावसाची शक्यता शून्य टक्के वर्तवण्यात आली आहे. याचा अर्थ चाहत्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय संपूर्ण ४० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो. नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी (पिच) सहसा फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते, त्यामुळे आज धावांचा पाऊस पडू शकतो.
आयपीएल अंतिम सामन्यात अचानक पाऊस आला आणि ३१ मे रोजी सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर फायनलसाठी रिझर्व्ह डे (राखीव दिवस) ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह डेच्या दिवशी सामना सहसा त्याच ठिकाणाहून सुरू होतो जिथे पहिल्या दिवशी थांबला होता. जर नाणेफेक (टॉस) झाल्यानंतर एकही चेंडू टाकला गेला नसेल, तर रिझर्व्ह डेला सामन्याची नव्याने सुरुवात होते.
आरसीबीने गेल्या हंगामात १७ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवून आपले पहिले आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. आता त्यांच्याकडे सलग दोन आयपीएल हंगामात चॅम्पियन बनण्याची सुवर्णसंधी आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत केवळ ५-५ वेळा जेतेपद पटकावणारे चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हेच संघ अशी कामगिरी करू शकले आहेत. चेन्नईने २०१०-२०११ आणि मुंबईने २०१९-२०२० मध्ये सलग २-२ हंगाम जिंकले होते. आता आरसीबीला असा पराक्रम करणारा तिसरा संघ बनण्याची संधी आहे.