

IPL 2026 controversy CSK legal issue Rajinikanth Jailer Coolie movie music dispute
चेन्नई : आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघ अडचणीत सापडला आहे. रजनीकांत यांच्या ‘जेलर’, ‘जेलर 2’ आणि ‘कुली’ या चित्रपटांतील गाणी, संगीत आणि संवादांचा अनधिकृत वापर केल्याप्रकरणी सन टीव्ही नेटवर्क लिमिटेडने सीएसके लिमिटेडविरुद्ध मद्रास उच्च न्यायालयात कॉपीराईट उल्लंघनाचा खटला दाखल केला आहे.
सीएसकेने नुकत्याच आपल्या आयपीएल 2026 च्या नवीन क्रिकेट जर्सीचे अनावरण करण्यासाठी सोशल मीडियावर एक प्रमोशनल व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओमध्ये सन टीव्हीच्या मालकीच्या चित्रपटांतील ऑडिओ ट्रॅक आणि संवादांचा वापर कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय करण्यात आला होता.
शुक्रवारी (13 मार्च) न्या. सेंथिलकुमार राममूर्ती यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सन टीव्हीच्या वतीने ज्येष्ठ वकील जे. रविंद्रन यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सांगितले की, सन टीव्हीने 1 मार्च 2026 रोजी सीएसकेला ई-मेल पाठवून या अनधिकृत वापराबाबत आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर सीएसकेने कॉपीराईट असलेल्या साहित्याचा वापर करणे थांबवले आहे. मात्र, भविष्यातही सीएसकेने अशी चूक पुन्हा करू नये आणि विनापरवाना कोणत्याही साहित्याचा वापर करू नये, अशी मागणी सन टीव्हीने केली आहे.
न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली आहे. सोमवारपर्यंत सीएसके लिमिटेडला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगण्यात आले आहे, त्यामध्ये त्यांनी यापुढे कोणत्याही परवानगीशिवाय संबंधित गाण्यांचा किंवा संगीताचा वापर करणार नसल्याचे स्पष्ट करावे, असे निर्देश दिले आहेत.