

India vs West Indies Test 2025 Shubman Gill toss win
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी एक मजेशीर क्षण पाहायला मिळाला. टीम इंडियाचा युवा कर्णधार शुभमन गिल याने कर्णधार म्हणून आपल्या सातव्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा टॉस जिंकला. टॉस जिंकल्याचा क्षण पाहताच भारतीय डगआऊटमध्ये आनंदाची लाट पसरली. संघातील सहकाऱ्यांसह सपोर्ट स्टाफनेही गिलचं अभिनंदन केलं, कारण या क्षणाची तो बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होता.
रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर गिलला कर्णधार बनवण्यात आलं होतं. गिलने इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेत कर्णधारपद भूषवलं. या दौऱ्यावरील पाचही कसोटी सामन्यांमध्ये तो टॉस हरला होता. यानंतर, वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यात अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतही नाणेफेक त्याच्या बाजूने झाली नाही. आता सातव्या कसोटीत त्याचं नशीब उघडलं आणि त्याने टॉस जिंकला. टॉस झाल्यानंतर तो ड्रेसिंग रूमकडे जाताना दिसला. मैदानावर उपस्थित असलेले रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, बुमराह आणि गंभीर यांनी त्याला मिठी मारून अभिनंदन केलं. त्यानंतर सिराज आणि इतर खेळाडू आणि स्टाफनेही गिलचं पहिल्यांदा टॉस जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं.
गिल टॉससाठी उभा असतानाही गंभीर आणि बुमराहचं लक्ष त्याच्याकडेच होतं. या सर्व क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहतेही जोरदार कमेंट करत आहेत. गिलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही. दुसरीकडे, वेस्ट इंडिजच्या संघाने दोन बदल केले आहेत. कर्णधार रोस्टन चेजने सांगितलं की, ब्रँडन किंग आणि जोहान लेन हा सामना खेळत नाहीत. त्यांच्या जागी तेविन इमलाक आणि एंडरसन फिलिप संघात आले आहेत.