

IPL 2025 Orange Cap Race
मुंबई : आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यानंतर पॉइंट टेबलमध्ये बदल होत आहे. तसेच स्पर्धेतील ऑरेंज कॅप यादीमध्येही सामन्यागणिक उलटफेर पहायला मिळत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीच्या काळात निकोलस पूरन आघाडीवर होता, परंतु त्यानंतर जेव्हा त्याच्या बॅटमधून धावा निघणे कठीण झाके तेव्हा तो खूप मागे राहिला. दरम्यान, जर आपण सध्याच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली तर या यादीत भारतीय फलंदाजांचे वर्चस्व दिसून येत आहे. अव्वल 4 मध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा आहे. पण येणाऱ्या काळात हे चित्र बदलू शकते.
आयपीएल ऑरेंज कॅपसाठीची चुरस खूपच रंजक होत चालली आहे. आतापर्यंत, आयपीएलच्या या हंगामात फक्त 6 फलंदाज असे आहेत जे 400 पेक्षा जास्त धावा करू शकले आहेत, त्यापैकी चार भारतीय आहेत. विदेशी खेळाडू आता मागे राहिलेले दिसतात. गुजरातचा सलामीवीर साई सुदर्शन सध्या 456 धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्याच्यानंतर आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा क्रमांक आहे. त्याच्या खात्यात 443 धावा जमा आहेत. या यादीत मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादवचाही समावेश आहे. तो 427 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
भारताच्या यशस्वी जैस्वालनेही गेल्या काही सामन्यांमध्ये चांगल्या खेळी केल्या आहेत. आता तो 426 धावा करून चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, विदेशी खेळाडूंमध्ये 400 धावांचा टप्पा पार करणारे दोन फलंदाज आहेत. यात जोस बटलरला (406 धावा) आणि निकोलस पूरन (404) हे अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहे. या यादीची सध्याची परिस्थिती काहीही असो, पण मोठी धावसंख्या कोणत्याही फलंदाजाला अव्वल स्थानावर घेऊन जाऊ शकते. अजूनही बरेच आयपीएल सामने शिल्लक आहेत. त्यामुळे यात बदल होण्याची दाट शक्यता आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते, परंतु संपूर्ण हंगामात या कॅपचे मानकरी बदलत राहतात. आयपीएल संपल्यावर ही कॅप कायमची दिली जाते. यंदाच्या हंगामात ही ऑरेंज कॅपसाठीची लढाई खूपच रंजक बनली आहे आणि येणाऱ्या काळात ही टोपी कोण घालतो हे पाहणे मजेदार असेल.