
Mumbai Indians players replacements IPL 2025
आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये 3 संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे. आता फक्त एका संघाचा निर्णय बाकी आहे. प्लेऑफमधील उर्वरित स्थानासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये चुरस आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने एक मोठी घोषणा केली असून त्यांनी तीन परदेशी खेळाडूंच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे. संघाने विल जॅक्स, रायन रिकेल्टन आणि कॉर्बिन बॉश यांच्या जागी जॉनी बेअरस्टो, रिचर्ड ग्लीसन आणि चरिथ असलंका यांचा संघात समावेश केला आहे.
जॅक्स, रिकेल्टन आणि बॉश हे शेवटचा लीग सामना खेळल्यानंतर आपापल्या राष्ट्रीय संघात सामील होणार आहेत. अशा परिस्थितीत, फ्रँचायझीला त्यांच्या जागी नव्या खेळाडूंचा समावेश करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
जॅक्सच्या जागी इंग्लंडचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टोला 5.25 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. बेअरस्टोला आयपीएलमध्ये चांगला अनुभव आहे आणि तो टी-20 स्वरूपात आक्रमक फलंदाज मानला जातो. त्याच्या उपस्थितीमुळे मुंबई इंडियन्सच्या टॉप ऑर्डर फलंदाजीला बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे.
रिकेल्टनच्या जागी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनला संघात स्थान देण्यात आले आहे. ग्लीसनला मुंबई इंडियन्सने 1 कोटी रुपयांना संघात घेतले आहे. ग्लीसनचा वेग आणि डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर टाकण्याची क्षमता संघासाठी महत्त्वाची ठरू शकते.
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू चारिथ असलंका याला 75 लाख रुपयांत कॉर्बिन बॉशच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. तो आक्रमक फलंदाजीसह ऑफ-स्पिन गोलंदाजी करतो. मुंबई इंडियन्स सध्या प्लेऑफच्या शर्यतीत आहे. जर संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरला, तर हे तीन नवीन बदली खेळाडू प्लेऑफ सामन्यांपासून संघामध्ये उपलब्ध असतील. यामुळे संघ संतुलित होण्यास आणि विदेशी खेळाडूंची कमतरता भरून काढण्यास मदत होईल.
मुंबई इंडियन्सचे लीग टप्प्यात 2 सामने शिल्लक आहेत. यामध्ये पहिला ते दिल्ली कॅपिटल्सला भिडतील तर शेवटच्या लीग स्टेज सामन्यात त्यांना पंजाब किंग्जचे आव्हान मिळेल. पंजाबने आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.