

14 year old ipl star vaibhav suryavanshi can not play for team india yet because of icc rule
दुबई : राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने गुजरात टायटन्सविरुद्ध एक संस्मरणीय खेळी खेळली आणि 35 चेंडूत शतक झळकावून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली. या खेळीच्या जोरावर त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
वैभवच्या वादळी खेळीने कर्णधार रोहित शर्मासह टीम इंडियाच्या सध्याच्या खेळाडूंचे लक्ष वेधून घेतले. हिटमॅनने त्याच्या खेळीचे कौतुक केले होते तर त्याच्या प्रशिक्षकानेही भाकीत केले होते की तो लवकरच भारतासाठी पदार्पण करेल. पण 14 वर्षीय वैभव सध्या भारताकडून खेळू शकणार नाही. खरंतर, एखाद्या खेळाडूने देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी किमान वय किती असावे याबद्दल आयसीसीचा एक नियम आहे.
वैभव सूर्यवंशी सध्या 14 वर्षे आणि 34 दिवसांचा आहे (वृत्त लिहिण्याच्या वेळी). 2020 मध्ये आलेल्या आयसीसीच्या नियमानुसार, कोणताही खेळाडू 15 वर्षांच्या वयाच्या आधी आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकत नाही. वैभव 27 मार्च 2026 रोजी 15 वर्षांचा होईल. त्यानंतरच तो भारतीय वरिष्ठ संघाचा भाग होऊ शकतो.
खरं तर, एखादा खेळाडू 15 वर्षांच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो, परंतु यासाठी बीसीसीआयला आयसीसीची परवानगी घ्यावी लागेल. जर आयसीसीने याला मान्यता दिली, तरच तो खेळाडू 15 वर्षांपूर्वीच भारतासाठी खेळू शकतो.
वैभवच्या आयपीएल कारकिर्दीला 2025 मध्ये सुरुवात झाली आणि राजस्थान रॉयल्सने त्याला 1.1 कोटींना विकत घेतलं होतं. याशिवाय, तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बिहारचं प्रतिनिधित्व करत आहे. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसेच अंडर-19 आशिया कपमध्येही तो भारतासाठी खेळला आहे.
वैभव सूर्यवंशीकडे असलेल्या प्रतिभेच्या आधारे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे की तो एक दिवस नक्कीच भारतासाठी खेळेल. मात्र, भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला भरपूर धावा कराव्या लागतील.