

Cricket Record 5 wickets in one over
जकार्ता: क्रिकेट या खेळात प्रत्येक चेंडूगणिक नवा विक्रम घडू शकतो, या वाक्याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. इंडोनेशियाचा २८ वर्षीय वेगवान गोलंदाज गेडे प्रियंदाना (Gede Priandana) याने क्रिकेटच्या इतिहासात आश्चर्यकारक कामगिरीची नोंद केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात एकाच षटकात पाच बळी घेतले असून, अशी कामगिरी करणारा प्रियंदाना हा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.
कंबोडियाविरुद्धच्या सामन्यात १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कंबोडियाचा संघ १५ षटकांत ५ बाद १०६ धावांवर होता. सामना दोन्ही संघ जिंकतील अशा स्थितीत होता. इंडोनेशियाच्या कर्णधाराने वेगवान गोलंदाज गेडे प्रियंदानाकडे चेंडू सोपवला. हे १६ वे षटकाने सामन्याला कलाटणीच दिली.
प्रियंदानाने षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर अनुक्रमे शाह अबरार हुसेन, निर्मलजीत सिंग, चंथोएन रथानक यांना तंबूत धाडत हॅट्ट्रिक घेतली. यानंतर एक चेंडू 'डॉट' टाकला. पुढील दोन चेंडूंवर मोंगडारा सोक व पेल वेन्नाक यांची विकेट घेत त्याने इतिहास रचला. संपूर्ण षटकात कंबोडियाला केवळ एक धाव घेता आली. तिही 'वाईड'च्या स्वरूपात मिळाली. १६ व्या षटकात पाच विकेट मिळाल्याने इंडोनेशियाने सामनाच जिंकला. दरम्यान,. या सामन्यात इंडोनेशियाच्या यष्टिरक्षक फलंदाज धर्मा केसुमा याने दमदार फलंदाजी केली. त्याने केसुमाने ६८ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ११० धावांची स्फोटक खेळी साकारली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात ५ बळी घेण्याची ही पहिलीच वेळ असली, तरी पुरुष देशांतर्गत (Domestic) टी-२० सामन्यांत यापूर्वी दोनदा अशी कामगिरी पाहायला मिळाली आहे. ती पुढील प्रमाणे :
अल-अमीन हुसेन: २०१३-१४ व्हिक्ट्री डे टी-२० कपमध्ये.
अभिमन्यू मिथुन: २०१९-२० सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत.
टी-२० आंतरराष्ट्रीय स्तरावर ही किमया साधणारा प्रियंदाना हा एकमेव खेळाडू ठरला आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत १४ वेळा एकाच षटकात चार बळी घेण्याचे प्रकार घडले आहेत. यात श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाचे नाव सर्वात वर येते, ज्याने २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध चार चेंडूंत चार बळी घेतले होते. मात्र, एकाच षटकात पाच गडी बाद करण्याचा पराक्रम इतिहासात पहिल्यांदाच नोंदवला गेला आहे.