

सुरत : मेघालयच्या आकाश चौधरीने 8 चेंडूंवर 8 षटकार मारण्याचा अभूतपूर्व पराक्रम करत प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक ठोकले आहे. लागोपाठ 6 षटकार ठोकत प्रथम-श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा फलंदाज देखील ठरला. यापूर्वी वेस्ट इंडिजचे महान खेळाडू गॅरी सोबर्स आणि भारताचे रवी शास्त्री यांनी असा पराक्रम गाजवला आहे.
मुख्यत्वेकरून वेगवान गोलंदाज असलेल्या चौधरीने हा विक्रम सुरत येथे अरुणाचल प्रदेशविरुद्ध सुरू असलेल्या रणजी करंडक प्लेट ग्रुप सामन्याच्या दुसऱ्या दिवशी केला. मेघालयाच्या डावात तो आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला, तेव्हा संघाची धावसंख्या 6 बाद 576 अशी होती. त्याने डावातील 126 व्या षटकात डावखुरा फिरकी गोलंदाज लिमर दाबीच्या गोलंदाजीवर सहा चेंडूंवर सलग सहा षटकार मारले आणि तो गॅरी सोबर्स आणि रवी शास्त्री यांच्यासारख्या जागतिक खेळाडूंच्या पंक्तीत सामील झाला. माइक प्रॉक्टर यांनीही सलग 6 षटकार मारले होते, मात्र, ते 2 षटकांमध्ये होते.
चौधरीने एका षटकात सलग 6 षटकार फटकावल्यानंतर आपले आक्रमण पुढील षटकातही सुरु ठेवले. यावेळी त्याने ऑफस्पिनर टीएनआर मोहितच्या गोलंदाजीवर आणखी सलग 2 षटकार खेचले आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने केवळ 11 चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला. 2012 मध्ये एसेक्सविरुद्ध ॲलेस्टरशायरच्या वेन व्हाईटने 12 चेंडूंमध्ये केलेल्या सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम त्याने एका चेंडूने मोडला.
आकाश चौधरी 14 चेंडूंमध्ये नाबाद 50 धावा करून परतला. आपले शेवटचे 3 चेंडू त्याने निर्धाव खेळून काढले होते. मेघालयाने 6 बाद 628 धावांवर आपला डाव घोषित केला. याला प्रत्युत्तर देताना अरुणाचल प्रदेशचा पहिला डाव केवळ 73 धावांत संपुष्टात आला. यातही आकाश चौधरीने 1 बळी घेतला. मेघालयाने फॉलो-ऑन दिल्यावर, चौधरीने आणखी 2 बळी घेऊन दिवसाअखेर अरुणाचल प्रदेशला 3 बाद 29 धावांवर रोखले.
25 वर्षीय चौधरीचा हा 31 वा प्रथम-श्रेणी सामना आहे. या विक्रमापूर्वी त्याने दोन अर्धशतकांसह 14.37 च्या सरासरीने 503 धावा केल्या होत्या. त्याने 28 लिस्ट-ए आणि 30 टी-20 सामनेही खेळले आहेत. गोलंदाजीमध्ये त्याने प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये 29.97 च्या सरासरीने 87 बळी, लिस्ट-ए मध्ये 29.24 च्या सरासरीने 37 बळी आणि टी-20 मध्ये 26.25 च्या सरासरीने 28 बळी घेतले आहेत.
वेळेच्या बाबतीत चौधरीचे हे अर्धशतक प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील दुसरे जलद अर्धशतक ठरले. यासाठी त्याने नऊ मिनिटांचा वेळ घेतला. 1965 मध्ये नॉटिंगहॅमशायरविरुद्ध लेस्टरशायरच्या क्लाईव्ह इनमन यांनी 13 चेंडूंमध्ये आठ मिनिटांत केलेल्या अर्धशतकाचा विक्रम अद्याप अबाधित आहे.
मेघालय पहिला डाव : 127 षटकात 6 बाद 628 घोषित.
(अर्पित भटेवरा 273 चेंडूत 207, किशन लिंगडोह 119, राहुल दलाल 102 चेंडूत 144, आकाश चौधरी 14 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 50).
अरुणाचल प्रदेश पहिला डाव : सर्वबाद 73
अरुणाचल प्रदेश दुसरा डाव : 10 षटकात 3 बाद 29.
पुणे : रणजी स्पर्धेतील ब गटातील इर्लाइट लढतीत कर्नाटकविरुद्ध महाराष्ट्राचा संघ दुसऱ्या दिवसअखेरी 113 धावांनी पिछाडीवर होता. कर्नाटकने आपल्या पहिल्या डावात श्रेयस गोपाल (71) व रविचंद्रन स्मरण (54) यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर सर्वबाद 313 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात महाराष्ट्राने रविवारी दुसऱ्या दिवशी 6 बाद 200 धावांपर्यंत मजल मारली. पृथ्वी शॉने सर्वाधिक 92 चेंडूत 9 चौकारांसह 71 धावा केल्या. दिवसअखेरीस जलज सक्सेना 34 तर विकी ओस्तवाल 4 धावांवर खेळत होते.
पर्वरी : मध्य प्रदेशविरुद्ध आणखी एका रणजी ब गट ईलाईट लढतीत गोव्याने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 284 धावांपर्यंत मजल मारली. सुयश प्रभुदेसाईने सर्वाधिक 65 तर दीपराज गावकरने 51 धावांची शानदार अर्धशतकी खेळी साकारली. याशिवाय, दर्शन मिसाळने 44 तर कर्णधार स्नेहल व ललित यादव यांनी प्रत्येकी 41 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशची पहिल्या डावात 7 बाद 181 अशी घसरगुंडी उडाली. एकवेळ तर हा संघ 5 बाद 56 अशा अडचणीत होता. त्यावेळी ऋषभ चौहान (43) व सारांश जैन (48) यांनी डाव सावरला होता.