

अबू धाबी : टी-20 क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये अनुभवी फिरकीपटू सुनील नारायणने 600 बळींचा टप्पा पार केला आहे. यापूर्वी कोणत्याही गोलंदाजाला हा टप्पा गाठता आला नव्हता. अनोखी गोलंदाजी शैली, कमालीचे वैविध्य आणि दडपण झुगारुन नैसर्गिक शैलीला भर देण्यातील हातोटीमुळे नारायणच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय जोडला आहे.
37 व्या वर्षीही त्याने आपला धडाका कायम ठेवत वर्ल्ड आयएलटी 20 स्पर्धेदरम्यान अबू धाबी नाईट रायडर्स आणि शारजाह वॉरियर्स यांच्यातील सामन्यात हा टप्पा सर केला. बुधवारी टॉम एबेलला बाद करून नारायणने हा माईलस्टोन सर केला. वेगातील बदल, ‘ड्रिफ्ट’ आणि फसवी फिरकीच्या बळावर त्याने प्रतिस्पर्ध्यांना सातत्याने नामोहरम केले आहे.
जागतिक टी-20 क्रिकेटमध्ये नारायणचा प्रवास लक्षवेधी ठरत आला आहे. ‘आयपीएल’मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससोबतच्या दीर्घकालीन कराराव्यतिरिक्त तो कॅरिबियन प्रीमियर लीगमधील ट्रिनबागो नाईट रायडर्स, मेजर लीग क्रिकेटमधील लॉस एंजेलिस नाईट रायडर्स आणि आयएलटी20 मधील अबू धाबी नाईट रायडर्ससाठी देखील महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. प्रत्येक फ्रँचायझीसाठी त्याने निर्णायक स्पेल दिले आहेत.