

India vs Pakistan Women Junior Asia Cup 2026
मोकी (चीन): महिला ज्युनियर आशिया चषक २०२६ स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने गुरुवारी पाकिस्तानचा १९-० असा धुव्वा उडवत दणक्यात उपांत्य फेरीत प्रवेश केला. चीनमधील मोकी येथे खेळवण्यात आलेल्या या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या रणरागिणींनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हा एकतर्फी विजय मिळवला.
गतविजेत्या असलेल्या भारतीय संघाने जपान, मलेशिया आणि दक्षिण कोरियाचा पराभव करून याआधीच आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले होते. आता अंतिम फेरीतील स्थानासाठी त्यांचा सामना दक्षिण कोरिया आणि मलेशिया यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्याच्या विजेत्याशी होईल.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. सातव्या मिनिटाला पूजा साहूने गोल नोंदवत भारताचे खाते उघडले. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत रोशनी ऐंदने गोल करत आघाडी दुप्पट केली. त्यानंतर तनुश्री दिनेश काडू, सुखवीर कौर आणि सानिका चंद्रकांत माने यांनी लागोपाठ गोल करत भारताची आघाडी भक्कम केली. सानिकाने २३ व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा गोल डागला. सामन्याच्या मध्यंतरापूर्वी तनुजा टोप्पो, पूजा मलिक आणि पूर्णिमा यादव यांनीही गोल नोंदवल्याने पहिल्या सत्राअखेर भारतीय संघ १०-० असा भक्कम स्थितीत होता.
मध्यंतरानंतरही भारतीय खेळाडूंचा आक्रमक खेळ सुरूच राहिला. पूजा मलिकने ४९ व्या आणि ५१ व्या मिनिटाला गोल करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. याशिवाय सुप्रियाने दोन गोल केले, तर कृष्णा शर्मा आणि बिनिमा धन यांनीही प्रत्येकी एक गोल डागून पाकिस्तानच्या अडचणीत भर घातली. सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला रोशनीने गोल करत भारताच्या १९-० अशा ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.
महिला ज्युनियर आशिया चषक विजेतेपदांची हॅट्ट्रिक पूर्ण करण्यापासून भारत आता केवळ दोन विजयांच्या अंतरावर आहे. भारताने २०२३ आणि २०२४ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.