India vs New Zealand: भारताच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच? रोहित, विराट आणि श्रेयस एकाच षटकात बाद; मॅट हेन्रीचा भेदक मारा

न्यूझीलंडविरुद्ध ३३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. यापूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेश या संघांवर अशी नामुष्की ओढवली होती.
India vs New Zealand
India vs New ZealandFile Photo
Published on: 
Updated on: 

India vs New Zealand:

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध ३३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने पहिल्याच षटकात भारताला तीन मोठे धक्के दिले. रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे तिन्ही दिग्गज फलंदाज खातेही न उघडता माघारी परतले. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने २०१९ च्या विश्वचषक उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध केलेल्या भेदक गोलंदाजीची आठवण करून दिली. त्याने पहिल्याच षटकात रोहित शर्माला गोल्डन डकवर बाद केले. त्यानंतर अवघ्या तीन चेंडूंनी विराट कोहलीलाही तंबूत पाठवले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळणाऱ्या श्रेयस अय्यरलाही हेन्रीने एलपीडब्ल्यू बाद केले. त्यामुळे भारताची अवस्था पहिल्याच षटकात बिनबाद धावसंख्येवरून ३ बाद अशी झाली. यामुळे भारताच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला; डावाच्या पहिल्याच षटकात कोणतीही धाव न काढता तीन बळी गमावणारा भारत हा जगातील तिसरा संघ ठरला.

India vs New Zealand
Gurnoor Brar NZ vs IND: गुरनूर बरारनं हद्द पार केली... अखेर विराटने हाताला धरून दूर केलं; गावसकरांनी कान उपटले, Video चर्चेत

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या संघाने डावाच्या पहिल्याच षटकात एकही धाव न करता तीन विकेट गमावण्याची ही केवळ तिसरी घटना ठरली. यापूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेश या संघांवर अशी नामुष्की ओढवली होती. विशेष म्हणजे, गेल्या १६ वर्षांत असे दुसऱ्यांदा घडले आहे की, एकाच एकदिवसीय सामन्यात रोहित आणि कोहली दोघेही शून्यावर बाद झाले आहेत. याआधी २०१० मध्ये डंबुला येथे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हे दोन्ही अनुभवी खेळाडू शून्यावर बाद झाले होते.

या मालिकेत रोहित शर्माची शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ आहे. मालिकेतील ऑकलंड येथे झालेल्या पहिल्या सामन्यातही त्याला लवकर माघारी परतावे लागले होते. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात रोहित पहिल्याच चेंडूवर बाद झाला. भारतासाठी सलामीवीर म्हणून खेळताना २०५ डावांमध्ये पहिल्यांदाच त्याच्यावर गोल्डन डकची नामुष्की ओढवली. हेन्रीच्या उसळी घेतलेल्या चेंडूचा अंदाज रोहितला आला नाही. चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागून दुसऱ्या स्लिपमध्ये झेलला गेला. त्यानंतर, कोहलीला हेन्रीच्या आत येणाऱ्या चेंडूने चकवले; चेंडू अपेक्षेपेक्षा थोडा खाली राहिल्याने तो कोहलीचा बचाव भेदून थेट यष्ट्यांवर आदळला. त्यानंतर लगेचच, श्रेयस अय्यरलाही हेन्रीने 'एलपीडब्ल्यू' बाद केले.

आतापर्यंतचे सर्वात उत्कृष्ट पहिले षटक?

गुणवत्तेचा विचार केला, तर एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्याच षटकातील ही सर्वोत्तम गोलंदाजी ठरू शकते. रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस इय्यर या तीन दिग्गज फलंदाजांना एकही धाव न देता बाद करण्याची कामगिरी मॅट हेन्रीने केली. उपलब्ध चेंडूनिहाय आकडेवारीनुसार, यापेक्षा प्रभावी पहिले षटक टाकण्याची कामगिरी केवळ चामिंडा वासने केली होती. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध त्याने सामन्याच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेतली होती. त्यानंतर आणखी एक विकेट मिळवत बांगलादेशची अवस्था पहिल्याच षटकाअखेर ४ बाद ५ धावा अशी केली होती. उपलब्ध चेंडूनिहाय आकडेवारीनुसार, एकदिवसीय डावाच्या पहिल्याच षटकात तीन किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा चामिंडा वास हा एकमेव गोलंदाज होता. मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांना पहिली धाव काढण्यासाठी तब्बल १७ चेंडू खेळावे लागले. पाच षटकांच्या अखेरीस भारताची धावसंख्या ३ बाद ८ अशी होती.

पाकिस्तान आणि बांगलादेशच्या नावावरही असा विक्रम

एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात तीन फलंदाज शून्यावर बाद होण्याची पहिली घटना १९९७ मध्ये घडली होती. लाहोर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना पाकिस्तानच्या संघाला वेगवान गोलंदाज शॉन पोलॉकने असे तीन धक्के दिले होते. त्यानंतर २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चामिंडा वासने बांगलादेशविरुद्ध पहिल्याच षटकात अशीच कामगिरी केली होती. दरम्यान, न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारताची अवस्था आणखी बिकट केली. मालिकेतील पहिला सामना खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडला काइल जेमिसनने झेलबाद केले. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलला पहिल्याच चेंडूवर पॉइंट क्षेत्रात झेल सुटल्याने जीवदान मिळाले. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे भारतीय संघावर मोठे संकट ओढवले.

India vs New Zealand
Arshdeep Singh Samreen Kaur Engagement Ring: १३८ वर्षापूर्वीचं डिझाईन... अर्शदीपनं समरीनला घातलेल्या खास डायमंड रिंगची किंमत किती?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.