

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या चालू मालिकेत आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आहे. एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 87 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक ठरले, मात्र त्याचे सहावे कसोटी शतक थोडक्यात हुकले.
जैस्वालने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत एजबॅस्टनच्या मैदानावर इंग्लिश वेगवान गोलंदाजांविरुद्ध आक्रमक शैलीत धावा जमवल्या. या भारतीय सलामीवीराने केवळ 59 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने करुण नायरच्या (31) साथीने दुसऱ्या गड्यासाठी 80 धावांची भागीदारी रचली. सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात जैस्वाल 107 चेंडूंत 87 धावा करून बाद झाला. बेन स्टोक्सने त्याला आपल्या गोलंदाजीचा बळी ठरवले.
जैस्वालचे शतक हुकले असले तरी त्याने 51 वर्षांपूर्वीचा जुना विक्रम मोडीत काढला. तो बर्मिंगहॅममध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम सुधीर नायक यांच्या नावावर होता. त्यांनी 1974 मध्ये 77 धावा केल्या होत्या. या मैदानावर अर्धशतक फटकावणारा जैस्वाल 5वा भारतीय सलामीवीर ठरला. यासह तो दिग्गज सुनील गावस्कर आणि चेतेश्वर पुजारा यांच्या क्लबमध्ये सामील झाला.
यशस्वी जैस्वालच्या आधी, बर्मिंगहॅममध्ये भारताकडून सलामीला सुधीर नायक, सुनील गावस्कर, चेतेश्वर पुजारा आणि चेतन चौहान यांनी अर्धशतके झळकावली आहेत. गावस्कर यांच्याकडे सर्वाधिक 3 अर्धशतके आहेत. इतर सर्व फलंदाजांनी प्रत्येकी 1 अर्धशतक केले आहे. सुधीर नायक यांच्या 77, गावस्कर यांच्या 68, पुजाराच्या 66, चेतन चौहान यांच्या 56 धावा या सर्वाधिक धावा आहेत. भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी 2022 मध्ये 38 धावांची खेळी खेळली.
यशस्वी जैस्वालने 22 व्या षटकात सलग तीन चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. जोश टंगच्या षटकात दुसरा चौकार मारताच त्याचे अर्धशतक पूर्ण झाले. यासाठी त्याने 59 चेंडू घेतले. त्याने 10 चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 101 धावा केल्या. दुसऱ्या डावात 4 धावा केल्यानंतर तो बाद झाला.
जैस्वालने 2023 साली वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 21 कसोटी सामन्यांतील 39 डावांमध्ये 53.78 च्या सरासरीने 1,990 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 5 शतके आणि 11 अर्धशतके जमा आहेत. नाबाद 214 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. मागील वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत त्याने 5 सामन्यांत 712 धावा केल्या होत्या.
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर मालिकेत पुनरागमन करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची दुसर्या कसोटीत सुरुवात संमिश्र झाली. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या दमदार फटकेबाजीने संघाला आधार दिला. पण दुसर्या सत्रात इंग्लंडने पुनरागमन करत भारताला धक्के दिले. नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने पुन्हा एकदा प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाच्या खेळात भारताने 3 गडी गमावून 182 धावा केल्या होत्या.
स्वच्छ सूर्यप्रकाशात सुरू झालेल्या सामन्यात ख्रिस वोक्सने भारताला सुरुवातीलाच धक्का दिला. सलामीवीर के. एल. राहुल (2) स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर, तिसर्या क्रमांकावर आलेल्या करुण नायरने जैस्वालसोबत डाव सावरला. या दोघांनी दुसर्या गड्यासाठी 80 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. सुरुवातीला संयमी खेळ करणार्या जैस्वालने नंतर आक्रमक पवित्रा घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, उपाहाराला काही वेळ शिल्लक असताना ब्रायडन कार्सने 31 धावांवर खेळणार्या नायरला बाद करत ही जोडी फोडली.
उपाहारानंतर सर्वांच्या नजरा जैस्वालवर होत्या. तो शतकाच्या दिशेने सहज वाटचाल करत होता, पण कर्णधार बेन स्टोक्सच्या एका बाहेर जाणार्या चेंडूवर कट मारण्याच्या प्रयत्नात तो यष्टिरक्षकाकडे झेल देऊन बसला. शतकाच्या उंबरठ्यावर बाद झाल्याने जैस्वाल प्रचंड निराश झाला. बुमराहच्या अनुपस्थितीत आणि तीन अष्टपैलू खेळाडूंसह खेळणार्या भारतीय संघावर यावेळी मोठी धावसंख्या उभारण्याचे दडपण होतेे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत भारतीय फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडले.
या सामन्यासाठी भारतीय संघात तीन मोठे बदल करण्यात आले. सर्वात आश्चर्यकारक निर्णय म्हणजे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली. त्याच्या जागी आकाश दीप, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात स्थान मिळाले आहे. पहिल्या कसोटीत निराशाजनक कामगिरी करणारे शार्दुल ठाकूर आणि साई सुदर्शन यांना संघाबाहेर ठेवण्यात आले.