

भारतीय संघ बुधवारी (दि. 2) बर्मिंगहॅमच्या मैदानावर पुन्हा एकदा उतरेल, तेव्हा सर्वांच्या नजरा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालवर खिळलेल्या असतील. जैस्वालची कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्धची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. मागील सामन्यातही त्याने शानदार शतक झळकावले होते, परंतु त्याचे हे शतक संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. दरम्यान, आगामी सामन्यात यशस्वी जैस्वालची बॅट तळपल्यास, तो क्रिकेटविश्वातील महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा एक मोठा विक्रम मोडू शकतो.
यशस्वी जैस्वालने आतापर्यंत 20 कसोटी सामन्यांच्या 38 डावांमध्ये 52 च्या सरासरीने 1903 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर पाच शतके आणि 10 अर्धशतके जमा आहेत. विशेष म्हणजे, जैस्वालने आपल्या एकूण धावांपैकी 817 धावा केवळ इंग्लंडविरुद्धच केल्या आहेत. त्याने सर्वाधिक कसोटी सामनेही याच संघाविरुद्ध खेळले आहेत. आता पुढील कसोटीतच इंग्लंडविरुद्ध आपल्या 1000 धावा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी जैस्वालकडे आहे.
इंग्लंडविरुद्ध 1000 कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी जैस्वालला केवळ 183 धावांची आवश्यकता आहे. इंग्लंडविरुद्ध सर्वात जलद एक हजार कसोटी धावा पूर्ण करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचे माजी महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे, जो अद्याप अबाधित आहे. ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्ध केवळ 13 डावात ही कामगिरी केली होती.
जैस्वालने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत 11 कसोटी डाव खेळले आहेत. म्हणजेच, जर पुढील सामन्याच्या पहिल्या डावातच जैस्वालने 183 धावा केल्या, तर तो केवळ 12 डावांमध्ये 1000 धावा पूर्ण करून ब्रॅडमन यांचा विक्रम मोडेल. मात्र, जर पहिल्या आणि दुसऱ्या डावात मिळून जैस्वालने या 183 धावा केल्या, तर तो त्याचा 13 वा डाव असेल. अशा परिस्थितीत तो डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकू शकणार नाही, पण त्यांच्या विक्रमाची बरोबरी नक्कीच साधेल.