

चेंगडू (चीन) : वृत्तसंस्था
गतविजेत्या भारतीय पुरुष संघाने थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत दबदबा कायम राखत ऑस्ट्रेलियाचा ५-० असा एकतर्फी पराभव केला आणि या दणदणीत विजयासह स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ‘अ’ गटात भारत आणि चीनने आपापले दोन्ही सुरुवातीचे सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले असून, आता बुधवारी होणाऱ्या भारत विरुद्ध चीन सामन्यात गटातील विजेता कोण, याचा फैसला होईल.
लक्ष्य, आयुष शेट्टीची विजयी घौडदौड
सामन्याची सुरुवात स्टार शटलर आणि राष्ट्रकुल विजेता लक्ष्य सेनने धडाक्यात केली. त्याने इफ्राईम स्टीफन सॅमचा २१-१४, २१-१६ असा सरळ सेटमध्ये पराभव करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर, आशियाई चॅम्पियनशिपचा उपविजेता आयुष शेट्टीने श्रेय धंडचा २१-८, २१-६ असा धुव्वा उडवत भारताची आघाडी दुप्पट केली.
सात्त्विक-चिरागकडून विजयावर शिक्कामोर्तब
दुहेरीच्या लढतीत आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते सात्त्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने रिझकी हिदायत आणि जॅक यू जोडीचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. या विजयासह भारताने सामन्यात ३-० अशी विजयी आघाडी घेत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले.
प्रणॉय आणि दुहेरी जोडीची निर्भेळ कामगिरी
अनुभवी एच. एस. प्रणॉयने ऋषी होंडा भूपतीवर २१-११, २१-१७ अशी मात करत भारताला ४-० वर नेले. अखेरच्या दुहेरी सामन्यात हरिहरन अमसकरुनन आणि एम. आर. अर्जुन या जोडीने अँडिका रामादियन्स आणि इफ्राईम सॅम जोडीचा २१-१२, २१-१० असा पराभव करून भारताच्या ५-० अशा ‘क्लीन स्वीप’वर शिक्कामोर्तब केले.