

नागोया: आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारताची धावपटू दीप्ती जीवनजीने महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या रेसमध्ये ५६.३६ सेकंद अशा विक्रमी वेळेसह सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या २०० मीटर टी१२ शर्यतीत सुवर्णपदक जिंकताना नवा स्पर्धा विक्रम नोंदवला.
दीप्ती जीवनजीने याआधी २०२४ मध्ये झालेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातली होती.
आता आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. तिला जपानच्या नीना कानोकडून कडवी झुंज मिळत होती. पण तिने कानो हिला २ सेकंदांनी मागे टाकलं. ५८.९२ सेकंदांसह कानो हिने रौप्य तर जपानची अकाने काटोने १ मिनिट ०.२६ सेकंदात शर्यत पूर्ण करत कांस्यपदक मिळवले.
अनुभवी धावपटू सिमरनने महिलांच्या २०० मीटर टी१२ शर्यतीत सुवर्णपदक जिंकताना नवा स्पर्धा विक्रम नोंदवला. या स्पर्धेतील तिचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. भारताच्या तेजलबेन दामोरने कांस्यपदक पटकावत भारताचे वर्चस्व अधोरेखित केले.
सिमरनने २४.८० सेकंदांत शर्यत पूर्ण केली. इराणच्या हाजर सफारजादेहने २५.०२ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले, तर या स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या तेजलबेनने २५.२३ सेकंदांत शर्यत पूर्ण करत कांस्यपदकावर नाव कोरले.
टी१२ प्रकारात मध्यम स्वरूपाचा दृष्टिदोष असलेल्या खेळाडूंचा समावेश होतो.न२६ वर्षीय सिमरनने २०२४ च्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
२०२३ मध्ये हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सिमरनने याच प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. आता ती १०० मीटर शर्यतीत सहभागी होणार असून, मागील स्पर्धेत तिने या प्रकारातही रौप्यपदक मिळवले होते. २४ वर्षीय तेजलबेन आता ४०० मीटर शर्यतीत सहभागी होणार आहे. भारतीय जलतरणपटू हिमांशू नांदल आणि निरंजन मुकुंदन यांनी आपापल्या प्रकारांत कांस्यपदके जिंकून भारताच्या पदकतालिकेत आणखी दोन पदकांची भर घातली.
२२ वर्षीय हिमांशूने पुरुषांच्या ४०० मीटर फ्रीस्टाइल एस११ प्रकारात ५ मिनिटे १०.९१ सेकंदांची वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळवले. चार स्पर्धकांमध्ये त्याने ही कामगिरी केली. ऑप्टिक नर्व्हच्या बिघाडामुळे हिमांशूचा जन्मतःच दृष्टीदोष होता.
त्यानंतर निरंजनने पुरुषांच्या २०० मीटर वैयक्तिक मेडले एसएम७ प्रकारात २ मिनिटे ५७.०१ सेकंदांत शर्यत पूर्ण करत कांस्यपदक पटकावले. याच प्रकारात भारताच्या सुयश जाधवने ३ मिनिटे ३.४० सेकंदांची वेळ नोंदवत पाचवे स्थान मिळवले.
पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताची अनेक पदके निश्चित
जागतिक विजेता प्रमोद भगत आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता कुमार नितेश यांनी आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या एसएल३ प्रकारात उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे भारताची या प्रकारातील पदके निश्चित झाली आहेत. भारतीय बॅडमिंटनपटूंनी मंगळवारी दमदार कामगिरी करत विविध प्रकारांत अनेक पदके निश्चित केली.
प्रमोद भगतने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या डायसुके फुजिहारा याचा २१-१२, २१-१० असा पराभव केला. सलग पाचव्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे. गुरुवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत त्याचा सामना दक्षिण कोरियाच्या ली सेउंगहू याच्याशी होईल.
कुमार नितेशने भारताच्याच विक्रम कुमारचा २१-८, २१-८ असा पराभव करत अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. उपांत्य फेरीत त्याची गाठ इंडोनेशियाच्या अल मुह इम्रान याच्याशी पडणार आहे. प्रमोद आणि नितेश यांनी आपापल्या उपांत्य फेरीच्या लढती जिंकल्यास एसएल३ प्रकारात अंतिम सामना भारताच्या दोन खेळाडूंमध्ये होईल.
प्रमोद भगतने मनीषा रामदासच्या साथीने मिश्र दुहेरी एसएल३-एसयू५ प्रकाराचीही उपांत्य फेरी गाठली.
उपांत्यपूर्व फेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या सिरिपॉन्ग टीमारोम आणि चनिडा श्रीनावाकुल यांचा २१-१५, २१-१४ असा पराभव केला.
कृष्णा नागर आणि नित्या श्री सुमती शिवन यांनीही एसएच६ मिश्र दुहेरी प्रकारात उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी चिनी तैपेईच्या वू यू-येन आणि लिन जिया-सियांग यांचा २१-१५, २१-१० असा पराभव केला. गट अ मध्ये दुसरे स्थान मिळवत त्यांनी उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली.
नितेश आणि तुळसिमती मुरुगेसन यांनाही मिश्र दुहेरी एसएल३-एसयू५ प्रकारात उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाल्यामुळे पदक निश्चित झाले आहे. या प्रकारात
एसएल३ आणि एसयू५ या दोन गटांतील खेळाडूंच्या जोड्या सहभागी होतात.
महिला एकेरीच्या एसएल३ प्रकारात संजना कुमारीने चीनच्या लिऊ युएमेई हिचा २१-१९, २१-१२ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.